आधीचा पूल व प्रस्तावित पूल
०---------------------------------------------------------------
परतवाडा : अमरावती विभागातील पहिला नावीन्यपूर्ण, काँक्रीट ब्लॉकवरील सिंगल कमानी पूल मेळघाटातील भूतखोऱ्यावर साकारला जाणार आहे.
परतवाडा-धारणी-बऱ्हाणपूर अशा प्रमुख आंतरराज्य मार्ग क्रमांक १४ वर सेमाडोहलगत भूतखोरा नामक नाल्यावर १९०५ मध्ये ब्रिटिशांनी ४.८० मीटर रुंदीच्या एका दगडी कमानीवर सर्वप्रथम यू-टर्न पूल बांधला. २२ जुलै २०२१ रोजी मेळघाटात झालेल्या ढगफुटीमुळे ११६ वर्षे जुना हा पूल खचला आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभाग, अचलपूर अंतर्गत चिखलदरा उपविभागाने या ब्रिटिशकालीन आयुष्य संपलेल्या पुलाऐवजी नव्या पुलाचा प्रस्ताव २०१६ मध्येच तयार केला. प्रस्तावाच्या अनुषंगाने निविदा प्रक्रिया ही पूर्ण केली गेली. नागपूर येथील आर्च इन्फ्रा कंपनीला हे कामही दिले गेले. पुलाकरिता लागणारे सहा ते सात हजार सिमेंट ब्लॉकही तयार करण्यात आले आहेत. पण, वनविभागाच्या मान्यतेअभावी या पूलाचे बांधकाम रखडले.
प्रस्तावानुसार, अपघाताला पूरक ब्रिटिशकालीन पुलावरील यू-टर्न पुलाच्या नव्या बांधकामात काढण्यात आला आहे. पूल सरळ होणार आहे. यामुळे रस्त्याची लांबी 80 मीटरने कमी होणार असून, ती जागा वन विभागाला आपोआप मिळणार आहे. या बांधकामात एकही झाड तुटणार नाही. रस्त्याच्या पुलाखालून वन्यजिवांना येजा करण्याकरिता मोकळी जागा ठेवण्यात आली आहे. वन, वन्यजिवांसह पर्यावरणपूरक या नव्या पुलाच्या बांधकामाकरिता केवळ ०.०८५ हेक्टर आर जागा लागणार आहे.
---पहिला पूल--
कॉंक्रीट ब्लॉकचा हा सिंगल कमानी पूल मेळघाटातीलच नव्हे, तर सार्वजनिक बांधकाम अमरावती प्रादेशिक विभागांतर्गत पहिला नावीन्यपूर्ण पूल आहे. या पूलाच्या कमानीची अंतर्गत रुंदी १८ मीटर असून, पुलाची रुंदी साडेपाच मीटर असणार आहे. प्रमुख राज्य महामार्गावरील भार सहन करण्याची क्षमता या नव्या पुलात आहे. जुन्या पुलावरील अपघाताला आमंत्रण देणारा यू-टर्न नव्या बांधकामात निघून जाणार आहे.
-- भूत खोरा---
ब्रिटिश कालीन हा पूल यू-टर्न असल्यामुळे अनेक अपघात या ठिकाणी घडले. यामुळे अंधश्रद्धेपोटी काहींनी या ठिकाणी भूत असल्याचा दावा केला आणि नाल्याला भूत खोरा असे नाव दिले. तेच आजही प्रचलित आहे.