मद्यधुंद पीएसआयचा प्रताप : इर्विनमध्येही केला तमाशा अमरावती : कोतवाली पोलीस ठाण्याचे पीएसआय सुनील जामनेकर यांनी मद्यधुंद अवस्थेत भरधाव कारने आॅटोरिक्षाला धडक दिली. त्यानंतर पोलीस ठाण्यांतही धिंगाणा घातला. या कृतीमुळे त्यांच्या निलंबनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.ही घटना रेल्वे स्थानक चौकात रविवारी रात्री ११.१५ वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी पीएसआयविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. अटक करून ठाण्यात आल्यानंतरही पीएसआयचा धुमाकूळ सुरूच होता. इतकेच नव्हे तर इर्विनमध्ये वैद्यकीय तपासणीदरम्यान गोंधळ घालून वरिष्ठ अधिकारी व महिला पोलिसांना वेठीस धरले. शहर कोतवाली ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत सुनील जामनेकर रविवारी रात्री कारने रेल्वे स्थानक चौकाकडून जात होते. ते मद्यधुंद अवस्थेत कार चालवीत असल्यामुळे त्यांच्या वाहनाने आॅटोरिक्षा क्रमांक एम.एच. २७-ए.-१६४९ ला जबर धडक दिली. या अपघातात आॅटोरिक्षाचालक शेख मन्नान (५०,रा.छायानगर) गंभीर जखमी झाले. अपघातात आॅटारिक्षाचा चुराडा झाला. त्यानंतर आॅटोरिक्षा रस्त्याच्या कडेला डीबीवर जाऊन धडकली. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. काही नागरिकांनी अपघाताला जबाबदार पीएसआयला बेदम चोप दिला. जखमी आॅटोरिक्षा चालकाला नागरिकांनी तत्काळ इर्विन रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे मध्यरात्री रेल्वे स्थानक चौकात गोंधळ उडाला होता. जामनेकर यांनी घटनास्थळावरून लगेच काढता पाय घेतला. एसीपी पोहोचले ठाण्यात पीएसआय जामनेकरच्या प्रतापामुळे सहायक पोलीस आयुक्त रियाजुद्दीन देशमुख यांनी तत्काळ कोतवाली ठाणे गाठले. सोबतच पीआय नागे, पीएसआय माधुरी उंबरकर कोतवाली ठाण्यात उपस्थित होते. जामनेकरांचा गोंधळ पाहून त्यांनी तत्काळ गुन्हे नोंदवून वैद्यकीय तपासणीसाठी इर्विनला नेले. मात्र, तेथेही ते वरिष्ठ पोलिसांचे म्हणणे ऐकून न घेता अरेरावी करीत होते. निलंबनाची टांगती तलवारपीएसआयच्या कारनाम्याची माहिती पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना मिळताच त्यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिलेत. पीएसआय जामनेकर याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी लोकमतशी बोलताना दिली. मद्यधुंद अवस्थेत अपघात घडविणाऱ्या पीएसआयविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यांच्यावर निलबंनाची कारवाई करण्यात येईल. - दत्तात्रय मंडलिक, पोलीस आयुक्त. जामनेकरविरुद्ध गुन्हा दाखलअमरावती : घटनेची माहिती मिळताच शहर कोतवाली पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. जखमीच्या तक्रारीवरून पीएसआय जामनेकरविरूद्ध गुन्हा नोंदविला. मध्यरात्री जामेनकरला कोतवाली पोलिसांनी अटक करून ठाण्यात आणले. मात्र, त्याने ठाण्यातच धिंगाणा घातला. पोलिसांनी जामनेकरांना वैद्यकीय तपासणीकरिता इर्विनला आणले. तेथेही वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर गोंधळ घालणे सुरूच ठेवले होते. या घटनेनंतर जामनेकरांना कोतवालीच्या कोठडीत रात्र काढावी लागली.
आधी दिली आॅटोेरिक्षाला धडक, मग घातला ठाण्यात धिंगाणा !
By admin | Updated: May 31, 2016 00:02 IST