रिव्हॉल्वर जप्त : दोन्ही टोळ्यांमधील आरोपींविरूद्ध गुन्हेअमरावती : वर्चस्वाच्या वादातून शहरात पुन्हा टोळीयुद्ध पेटले. कुख्यात गुन्हेगार राजा पटेल व नीलेश जाधव यांच्यामधील जुना वाद सोमवारी उफाळून आला. त्यातूनच नीलेश जाधवने राजा पटेलवर गोळी झाडली तर प्रत्युत्तरादाखल राजा पटेलकडून चाकू हल्ला करण्यात आला. यामुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी सायंकाळी ही घटना नवीन कॉटन मार्केटजवळ घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. याप्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी दोन्ही टोळ्यांमधील सदस्यांविरूद्ध गुन्हे दाखल केले दोन्ही टोळ्यांच्या म्होेरक्यांना अटक केली आहे. पोलीस सूत्रानुसार पॅरॅडाईज कॉलनीतील काही युवकांचा शोभानगरातील युवकांसोबत जुना वाद आहे. यामुळे त्यांच्यात वारंवार खटके उडतात. यातूनच सोमवारी राजा पटेल (रा.पॅरॅडाईज कॉलनी)व दुसऱ्या गटातील नीलेश जाधव हे दोघे आपापल्या साथीदारांसह नवीन कॉटन मार्केट परिसरात समोरासमोेर आलेत. नीलेश जाधवने राजा पटेलवर रिव्हॉल्वरने गोळा झाडली. मात्र, नेम चुकल्याने राजा पटेल बचावला. त्यानंतर झालेल्या हाणामारीत राजा पटेल व नीलेश जाधव यांनी एकमेकांवर चाकू हल्ला केला. यात दोघेही जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी दोन्ही टोळ्यांमधील सदस्यावर गुन्हे नोंदविले आहेत. याघटनेतील अन्य दोषींचा शोध पोलीस युद्धस्तरावर घेत आहेत. शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे सामान्य नागरिक धास्तावले असून गुन्हेगारांवरील पोलिसांचा वचक कमी झाल्याची चर्चा आहे. दोन्ही टोळ्यांचे जुने वाद असून त्यांनी सोमवारी एकमेकांवर प्राणघातक हल्ला केला. दोन्ही टोळ्यांवर गुन्हे नोंदविण्यात आले असून नीलेश जाधव या आरोपीकडून एक रिव्हॉल्वर जप्त करण्यात आली आहे. - के.एम.पुंडकर,पोलीस निरीक्षक, गाडगेनगर ठाणे.
फायरिंग, चाकूहल्ला शहरात टोळीयुद्ध पेटले
By admin | Updated: February 8, 2017 00:12 IST