जंगली तुळस, गवत जळून खाक :
चांदूर रेल्वे : तालुक्यातील कोदोरी हरक या गावठाणाला लागून असलेले ई-क्लासमधील झुडुपे (जंगली तुळस) व गवताला आग लागल्याची घटना शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, चांदूर रेल्वेहून २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या कोदोरी हरक या गावठाणालगत ११.२२ हेक्टर आर व गट क्र. ९४ क्षेत्र ०.७३ हेक्टर आर ई-क्लास जमीन आहे. त्यातील जंगली तुळस, गवत तसेच गावठाणाच्या अवती-भोवती असलेल्या शेताच्या धुऱ्यावरील झुडुपांना अचानक आग लागली. सदर आगीची माहिती गावाचे पोलीस पाटील सचिन इंगोले यांनी प्रथम अग्निशमन दलाला दिली. चांदूर रेल्वेचे तहसीलदार व नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्यालासुद्धा कळविले. ग्रामस्थांच्या मदतीने काही प्रमाणात आग आटोक्यात आल्यानंतर अमरावती महानगरपालिका व चांदूर रेल्वे येथील नगर परिषदेचे अग्निशमन दल पोहोचले. त्या बंबाने सदर आग आटोक्यात आली. अग्निशमन दलासोबतच सरपंच अजय सोळंके, उपसरपंच अशोक ढोबळे, कोतवाल आशिष इंगोले, वायरमन विक्की लोखंडे, पोलीस पाटील सचिन इंगोले, नायब तहसीलदार बबन राठोड, तलाठी तामगाडगे, मंडळ अधिकारी अमोल देशमुख, नांदगाव खंडेश्वर येथील पोलीस कर्मचारी हेसुद्धा घटनास्थळी दाखल झाले होते.