आॅनलाईन लोकमतअमरावती : बाजारभावाच्या तिप्पाट किमतीत खरेदी करण्यात आलेल्या मल्टियूटिलिटी फायर रेस्क्यू वाहन प्रकरणातील अनियमितता दडपविण्याचा घाट अग्निशमन विभागाने रचला आहे. याप्रकरणी नगरविकास मंत्रालयासह विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, अग्निशमन अधीक्षकांनी ते आदेश झिडकारल्याचे रखडलेल्या चौकशीवरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या सुमारे १.५० कोटी रुपयांच्या अनियमिततेचा खरा सूत्रधार महापालिकेतील एक बडा अधिकारी व एक तथाकथित कन्सल्टंट असल्याचा आरोप महापालिका वर्तुळात होत आहे.अग्निशमन अधीक्षक भारतसिंह चौहान हे नगरविकास खात्यासह महसूल यंत्रणेतील उच्च अधिकाºयांना जुमानत नसल्याचे वास्तव यानिमित्ताने उघड झाले आहे. येथील सामाजिक कार्यकर्त्याने फायर रेस्क्यू वाहनाच्या खरेदी प्रक्रियेत लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याचे सप्रमाण दर्शवून दिले आहे. त्या तक्रारीतील वस्तुनिष्ठता पाहून नगरविकास विभागासह विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाºयांना त्याची दखल घ्यावी लागली. तिन्ही बड्या अधिकाºयांकडून चौकशीचे आदेश आलेत. मात्र, ते चौकशीचे आदेश भारतसिंह चौहान यांनी या वाहन खरेदीच्या फाइलमध्ये ठेवण्याची तसदी तेवढी घेतली आहे. मात्र, दीड महिना उलटला असतानाही चौहान यांनी चौकशी किंवा त्याबाबतचा अहवाल वरिष्ठांना सोपविला नसल्याने या व्यवहारात त्यांचेही हात ‘ओले’ झाले नसावेत ना, अशी शंका तक्रारकर्त्यांनी व्यक्त केली आहे. बाजारात ५० ते ७० लाख रुपयांमध्ये उपलब्ध असलेले मल्टियूटिलिटी फायर रेस्क्यू वाहन अग्निशमन विभागाने तब्बल २ कोटी ४ लाख रुपयांमध्ये खरेदी केले. त्यासाठी एका स्थानिक व्यक्तीने कन्सल्टंटशी संधान साधून निधी एंटरप्रायजेससाठी किल्ला लढविला. त्यानंतर मॅन्यूफॅक्चरर नसताना निधी एंटरप्रायजेसला २.०४ कोटींमध्ये हे वाहन पुरविण्याचे आदेश देण्यात आले. पुरवठा आदेशातील कालावधीही महिन्यापूर्वीच संपुष्टात आला आहे. या व्यवहारात किती जणांचे हात ‘ओले’ झाले, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.असे आलेत चौकशीचे आदेशविभागीय आयुक्तांनी ३१ जानेवारीला, जिल्हाधिकाºयांनी १२ फेब्रुवारीला, तर मुंबईच्या नगरविकास विभागाने १५ फेब्रुवारीला या प्रकरणाचे चौकशीचे आदेश महापालिका प्रशासनाला दिलेत. मात्र, २८ मार्चपर्यंत अग्निशमन अधीक्षक वा वरिष्ठांनी कुठलीही चौकशी आरंभली नाही किंवा कुठलाही अहवाल वरिष्ठांना पोहोचता केला नाही. यावरुन चौहानांची लेटलतिफी उघड झाली आहे.प्रकरणाच्या चौकशीबाबत पत्र प्राप्त झालेत. चौकशी झाल्यानंतर अहवाल तिन्ही यंत्रणांना पाठविण्यात येईल.भारतसिंह चौहानअग्निशमन अधीक्षक, महापालिका
अग्निशमन ‘नगरविकास’वर भारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 22:14 IST
बाजारभावाच्या तिप्पाट किमतीत खरेदी करण्यात आलेल्या मल्टियूटिलिटी फायर रेस्क्यू वाहन प्रकरणातील अनियमितता दडपविण्याचा घाट अग्निशमन विभागाने रचला आहे.
अग्निशमन ‘नगरविकास’वर भारी!
ठळक मुद्देदोन कोटींची अनियमितता दडवण्याचा खटाटोप : चौकशीला मुहूर्त मिळेना, सूत्रधार वेगळाच