कारवाई पूर्ण : २५ आॅक्टोबरनंतर मिळणार आदेश अमरावती : मेळघाटात १५ वर्षे सेवा बजावणाऱ्या २५३ शिक्षकांना कार्यमुक्तीचे आदेश जि.प. शिक्षण विभागाने काढले आहेत. केवळ बदली झालेल्या शिक्षकांना आदेश हे २५ आॅक्टोबरनंतरच मिळणार आहेत. त्यामुळे मेळघाटातील या बदलीपात्र शिक्षकांना न्याय मिळणार आहे.मागील सप्टेंबर महिन्यात मेळघाटातील बदली पात्र शिक्षकांनी जिल्हा परिषदेसमोर शिक्षकांनी उपोषण सुरू केले होते. या उपोषणाची आ. बच्चू कडू यांनी दखल घेऊन शिक्षण विभागाचे प्रधान सचिव व सीईओं किरण कुलकर्णी यांच्याशी चर्चा केल्यानंतर आंदोलना दरम्यान बदली पात्र शिक्षकांना आठवडाभरात कार्यमुक्त करण्याचे आदेश आश्वासन दिले होते. तर यार्पैकी २१ शिक्षकांना आंदोलन कालावधीत बदली आदेश दिले आहेत. उर्वरित शिक्षकांना २५ आॅक्टोबरपर्यंत आदेश देण्याचे सीईओंनी मान्य केल्यानुसार शिक्षण विभागाने कारवाई पूर्ण केल्याची माहिती आहे. जि.प. प्रशासनाने न्यायालयीन निर्णयाच्या अधिन राहून सन २०१५-१६ मध्ये बदली प्रक्रिया राबवून विषय शिक्षकांच्या नेमणुकी अतिरिक्त शिक्षकांचे तालुका व जिल्हास्तरावर समायोजन तसेच मेळघाटात १३ वर्षांपासून कार्यरत असलेल्या २०८ शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या केल्या होत्या. या बदल्या झाल्यानंतर प्रशासकीय बदलीमध्ये एकास एक या प्रमाणात बदली होऊन सपाटीवरील शिक्षकांनी शासनाची दिशाभूल करून झालेली प्रक्रिया वेगवेगळ्या प्रकारच्या याचिका दाखल झाल्यामुळे खोळंबून पडली होती. याबाबत न्यायालयाने शासनाच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे जूनमध्ये करण्यात आलेली बदली प्रक्रिया ही न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे बदली झालेल्या शिक्षकांना आदेश देता आले नाही. ६ सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयाकडून मिळालेल्या निर्णयानुसार जिल्हा प्रशासनाने विषय शिक्षक, अतिरिक्त शिक्षक तसेच मेळघाटातून प्रशासकीय बदल्या झालेल्या शिक्षकांना आदेश देणे आवश्यक होते. मात्र हा आदेश न दिल्याने कार्यमुक्त आदेशाची मेळघाटातील शिक्षकांनी मागील उपोषण सुरू केले होते. अखेर यावर आ. कडू यांनी सीईओ किरण कुलकर्णी यांच्यासोबत चर्चा केले. त्यानुसार मेळघाटातील या शिक्षकांना दिवाळीपूर्वी कार्यमुक्त केले जाणार आहे. यामधील २१ शिक्षकांचे आदेश देण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्यात ५० व त्यानंतर उर्वरित शिक्षकांना मेळटातून कार्यमुक्त केले जाणार आहे. तर सपाटीवरील २५३ शिक्षकांना मेळघाटात पाठविले जाणार आहेत. या बदल्याबाबत प्रशासनाने आदेश तयार केले आहेत. केवळ दिवाळी सुट्यांची प्रतीक्षा आहे. हा आदेश मिळताच मेळघाटातील शिक्षक कार्यमुक्त होणार आहेत, तर सपाटीवरील शिक्षक मेळघाटात पाठविले जाणार आहेत. (प्रतिनिधी)
अखेर मेळघाटातील शिक्षकांचे बदली आदेश निघालेत
By admin | Updated: October 17, 2016 00:16 IST