फोटो ३० एएमपीएच ०१.१२
यशोमती ठाकूर यांची कठोर भूमिका, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट
लोगो - दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण
अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक तथा अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी याचे मंगळवारी निलंबन करण्यात आले. महिला व बाल कल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन विशेष बाब म्हणून रेड्डीचे निलंबन करून घेतले.
मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत गुगामल वन्यजीव विभागाच्या हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी २५ मार्च रोजी गोळी झाडून आत्महत्या केली. या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली.
दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी गुगामल वन्यजीव विभागाचा उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला धारणी पोलिसांनी अटक करून त्याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मात्र, दीपाली चव्हाण यांनी चार पानांच्या सुसाईड नोटमधून विनोद शिवकुमारसह एम.एस. रेड्डी हा सुद्धा तितकाच जवाबदार असल्याचे स्पष्ट झाले. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येने अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. वनविभागात महिला अधिकारी, कर्मचारी असुरक्षित असल्याचे या निमित्ताने पुढे आले. त्यामुळे महिला व बाल कल्याणमंत्री यांनी मेळघाटच्या जंगलात ‘लेडी सिंघम’ अशी ओळख असलेल्या दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी सखोल चौकशी व्हावी, अपर मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या गंभीर प्रकरणाची माहिती देत निलंबनाचे आदेश जारी करून घेतले.
दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणानंतर विनोद शिवकुमार याला आरोपी करण्यात आले. त्यानंतर २६ मार्च रोजी एम.एस. रेड्डी यांना नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) कार्यालयात हजर राहण्याचे आदेश निर्गमित झाले. मात्र, रेड्डी यांनी ही बदली नैसर्गिक न्यायतत्त्वाने नसल्याचे स्पष्ट करीत वनखात्याला चॅलेंज केले होते. बदली आदेशाला आव्हान देण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारीदेखील चालविली होती. मात्र, ना. यशोमती ठाकूर यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे अखेर रेड्डी यांचे निलंबन झाले, हे विशेष.
बॉक्स
लैगिक अत्याचारात सामील असलेल्यांना कडक शासन होईल - यशोमती ठाकूर
आया, बहिणींना त्रास देणाऱ्या रोडरोमिओंबरोबर सरकारी तसेच खासगी कार्यालयात लैंगिक शोषण करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना चांगला धडा शिकविण्याची ही वेळ आहे. राज्यात अशा गुन्ह्यांना व गुन्हेगारांना माफी नाही. सगळ्यांना कडक शिक्षा मिळेल. एकूणच कार्यालयामध्ये विशाखा समित्यांचा आढावा घेण्यात येईल. हा जिजाऊंचा महाराष्ट्र आहे. गुन्हेगार आणि त्याला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्याचा कडक शिक्षा व्हायला पाहिजे. लोक कायदा हातात घेण्याची भाषा बोलतात. अशांना पोलिसांनी धडा शिकविला पाहिजे. लैंगिक अत्याचारात सामील असलेल्यांना कडक शासन होईल, हेच माझे वचन आहे. एकालाही सोडणार नाही. कुणाला त्रास असेल, अशा महिलांनी महिला आयोगाकडे तक्रारी करावी. मी रोज सर्व तक्रारींचा आढावा घेईन, असे वचन राज्याच्या महिला व बाल कल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांनी ‘लाेकमत’शी बोलताना दिले.