उपवनसंरक्षकांचे आदेश : गुरुवारपर्यंत राहणार बंदअमरावती : नियमबाह्य लाकूड साठवून ठेवणे, विनापरवानगीने आरागिरणी भाड्याने देणे, वन तरतुदीचा भंग करणे आदी कारणांमुळे गोपालनगर एमआयडीसीतील संजय इंडस्ट्रिज (आरागिरणी) पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आले आहे. उपवनसंरक्षक हेमंत मीणा यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. एमआयडीसी परिसरातील संजय सॉ मिलमध्ये नियमबाह्य लाकूड साठवून ठेवण्यात आल्याची माहिती उपवनसंरक्षक हेमंत मीणा यांना खबऱ्यांकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे ३ फेब्रुवारी रोजी सहायक वनसंरक्षक राजेंद्र बोंडे यांच्यासह काही वनकर्मचाऱ्यांनी संजय सॉ मिल (परवाना क्र. ए- २४) चे निरीक्षण केले. निरीक्षणादरम्यान निम प्रजातीचे इमारती लाकडाचे एकूण नग २४, परिमाण ०.७९४ घन मीटर लाकूड आढळून आले. या इमारती लाकडांबाबत दस्ताऐवज, वाहतूक परवाना अथवा लाकडावर निशाणी (हॅमर) नसल्याचे वनाधिकाऱ्यांना लक्षात आले. त्यामुळे वन विभागाच्या चमुने सदर लाकूड आणि आरागिरणीत उभे आरायंत्र आकार ३६ इंची एक नग व ईलेक्ट्रिक मोटर जप्त केली होती. आरागिरणीे परवानाधारक विवेक बोराडे यांच्यासह तीन जणांविरुद्ध महाराष्ट्र वन नियमावली २०१४ चे नियामातील तरतुदींचा भंग केल्याबाबत प्राथमिक गुन्हा नोंदविला आहे. गुन्हा रिपोर्ट क्रमांक २०/९ अन्वये ३ फेब्रुवारी रोजी वनगुन्हे दाखल करण्यात आले आहे. संजय आरागिरणीत नियमबाह्य प्रकार घडल्याबाबत सदर गुन्ह्याचा अंतिम निवाडा होईपर्यंत आरागिरणी सुरू होणार नाही, असे कारवाईचे स्वरुप ठरले आहे. त्यानुसार आरागिरणी मालकांना नोटीस बजावण्यात आली आहे. याप्रकरणी सहायक वनसंरक्षक राजेंद्र बोंडे हे तपास करीत आहेत. जिल्ह्यात अवैध लाकूड विक्री होत असल्याचे सर्वश्रूत आहे. खुल्या जागेवर नियमबाह्य साठवून ठेवण्यात येणारे लाकूड हीदेखील वनविभागाकडे मोठी समस्या निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)आरागिरणी मालकांना बाजू मांडण्याची संधीसंजय सॉ मिलमध्ये नियमबाह्य लाकूड आढळल्याप्रकरणी वनगुन्हा जारी केला आहे. मात्र, पुढील कारवाई करण्यापूर्वी वन विभागाने आरागिरणी मालकाला बाजू मांडण्याची संधी देण्यात आली आहे. गुरुवारी उपवनसंरक्षक आरागिरणी मालकाची बाजू ऐकुण घेतील. ही बाब नोटीसद्वारे कळविली आहे.संजय सॉ मिलमध्ये वनाधिकाऱ्यांनी निरिक्षणअंती सादर केलेल्या अहवालानुसार ही आरागिरणी पहिल्या टप्प्यात सील करण्यात आली आहे. ९ फेब्रुवारी रोजी सुनावणीनंतर पुढील निर्णय होईल.- हेमंत मीणाउपवनसंरक्षक, अमरावती.
-अखेर ‘ती’ आरागिरणी सील
By admin | Updated: February 8, 2017 00:17 IST