संजय राऊत : महानगर शिवसेनेचा मेळावाअमरावती : महानगरपालिका निवडणुका जिंकण्यासाठी सज्ज व्हा. महापालिकेच्या निवडणुकीत आमचा मित्र पक्ष भाजपा सोबत आली तर मैत्रीपूर्ण लढू. नाही आली तर सवबळावर निवडणुका लढण्यासाठी शिवसैनिक सक्षम आहेत, असे प्रतिपादान शिवसेना नेते, खा. संजय राऊत यांनी केले. येथील संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात शनिवारी आयोजित शिवसेना महानगरतर्फे आयोजित मेळाव्यात मुख्य वक्ता म्हणून ते बोलत होते. होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपाला आमचा पाठिंबा आहे. पण आमचे सरकार नाही. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुढील अमरावतीत होऊ घातलेल्या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. व्यासपीठावर खा. आनंदराव अडसूळ, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रशांत वानखडे, राजेश वानखडे, महानगर प्रमुख सुनील खराटे, प्रवीण हरमकर महिला आघाडीच्या वर्षा भुयार, रेखा खारोडे, शोभा लोखंडे, मनीष टेंबरे, आदी प्रामुख्याने उपस्थिीत होते. महापालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वी कुठल्याही गटातटाचे राजकरण न करता कामाला लागण्याचा सल्ला खा. आनंदराव अडसूळ यांनी दिला. संचालन नरेंद्र केवले यांनी केले. यावेळी हजारो शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
स्वबळावर लढू, सज्ज रहा
By admin | Updated: August 28, 2016 00:02 IST