अमरावती : भारतीय अन्न महामंडळाचे पश्चिम विदर्भातील कामकाज सुलभ करण्यासाठी भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय)चे विभागीय कार्यालय अमरावती येथे कार्यान्वित करण्यात आले. मंडळाचे प्रबंधक नरेंद्र कुमार तसेच सहायक महाप्रबंधक डी.आर. पासवान यांच्या हस्ते मंगळवारी कार्यालयाचा शुभारंभ झाला.
हे कार्यालय शहरातील मुख्य टपाल कार्यालयासमोरील दूरसंचार भवनाच्या तिसऱ्या माळ्यावर कार्यान्वित झाले असून, कामकाजाला सुरुवात करण्यात आली. राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम अंतर्गत देशातील जनतेची अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यात भारतीय अन्न महामंडळाची महत्त्वाची भूमिका आहे. शेतकऱ्यांकडून शेतीमाल खरेदी करण्यासंबंधी एफसीआय एक विश्वासार्ह सरकारी संस्था म्हणून काम करीत आहे. अमरावती येथे भारतीय अन्न महामंडळाचे विभागीय कार्यालय सुरू झाल्याने याचा फायदा पश्चिम विदर्भातील शेतकरी यांच्यासह सहकारी संस्था, अन्न सुरक्षा कायद्याचे लाभार्थी, स्वयंसेवी संस्था आदींना होणार आहे.
बॉक्स
जलद गतीने होणार कामकाज
कोरोना काळात निरंतर खाद्य पुरवठा करून मंडळाने कार्यक्षमतेने जबाबदारी पार पाडली आहे. पश्चिम विदर्भातील साठवण क्षमता, व्यवस्थापन, सार्वजनिक वितरण प्रणालीचे नियोजन आणि सुधारित संरचनेनुसार खाद्यान्न खरेदी विभागीय कार्यालयामार्फत केली जाणार आहे. विभागीय कार्यालय अमरावती येथे कार्यान्वित झाल्यामुळे काम कार्यक्षमपणे व जलद गतीने होणार आहे.