अमरावती : पाच लाख रुपये आणण्यास सांगितले, ते का आणले नाहीत? या कारणावरून अश्लील शिवीगाळ करून सासऱ्याने सुनेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना नागपुरीगेट ठाणे हद्दीत १४ ते २३ डिसेंबर दरम्यान घडली.
याप्रकरणी सुनेच्या तक्रारीवरून शुक्रवारी नागपुरीगेट पोलिसांनी सासऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. पोलीससूत्रानुसार, शेख उस्मान ऊर्फ भुर वल्द शेख शमी (४५, रा. खोलापुरीगेट) असे आरोपीचे नाव आहे. एका महिलेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३५४,२९४,५०६ अन्वये गुन्हा नोंदविला. फिर्यादी ही आपल्या सासरवाडीत आली असता, आरोपी सासऱ्याने तिला पाच लाख रुपये देण्यास सांगितले. त्यानंतर सासऱ्याने सुनेसोबत वाद करून तिचा हात पकडून विनयभंग केला. तिने आरडाओरड करून आरोपीकडून सुटका करवून घेतली. त्यानंतर सासऱ्याने तिला घरातून हकालून लावले. तिने माहेरी जाऊन नातेवाईकांच्या सहकाऱ्याने नागपुरीगेट पोलीस ठाणे गाठले.