अमरावती : जिल्हा क्रीडा संकुलाच्या प्रांगणात सुरू असलेल्या दौड चाचणीदरम्यान महिला उमेदवारांची शौचालयास जाण्यासाठी चांगलीच गैरसोय झाली. पोलीस विभागाने फिरते प्रसाधनगृह उपलब्ध करून दिले होते. मात्र, या प्रसाधनगृहात चढण्यासाठी महिलांना तारेवरची कसरतच करावी लागली. महिला पोलीस भरती प्रक्रियेसाठी रविवारी ७५० महिलांना बोलाविण्यात आले होते. त्यामध्ये दस्तऐवज तपासणीत बहुतांश महिला उमेदवार पात्र ठरल्या आहेत. पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात महिला उमेदवारांची विविध चाचणी पार पडली. त्यामध्ये उंची तपासणे, गोळा फेक, उंच उडी, १०० मीटर दौड चाचणी पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात पार पडली. त्यानंतर ८०० मीटर दौड चाचणीसाठी पात्र उमेदवारांना पोलीस व्हॅनद्वारे जिल्हा क्रीडा संकुलात आणले गेले. मात्र, या ठिकाणी पोलीस विभागाकडून विशेष सुविधांचा अभाव दिसून आला. महिला उमेदवारांनाचेंजिंग रुमची व्यवस्था नसल्याने त्यांची अडचण झाली. पोलिसांनी उमेदवारांसाठी पाणी पिण्याची सोय केली होती. एक पाण्याचा ड्रम ठेवून उमेदवारांची तृष्णातृप्ती केली. पोलिसांनी महिलांसाठी फिरत्या प्रसाधनगृहाची सोय केली होती. मात्र, प्रसाधनगृहाला पायऱ्या नसल्यामुळे चढताना तारेवरची कसरत करावी लागली. काहींना नाइलाजास्तव उंच असले तरी त्या प्रसाधनगृहाच्या टायरवर पाय ठेवून वर चढावे लागले. त्यामुळे त्यांना मन:स्ताप सहन करावा लागला. रविवारी उन्हाचा पारा ४४.६ अंशावर पोहोचल्याने भरतीसाठी आलेल्या महिलांना चांगलेच चटके सहाव करावे लागले. रविवारी घेण्यात आलेल्या पोलीस भरतीतील चाचणीसाठी ५६२ पैकी ४५८ उमेदवार उपस्थित होते. त्यापैकी पात्र ठरलेल्या ३७५ उमेदवारांच्या मैदानी चाचण्या घेण्यात आल्यात. (प्रतिनिधी)विवाहित महिलांसाठी पोलीस भरती ठरली डोकेदुखी४विविध जिल्ह्यांतून अनेक महिला अमरावतीत आल्यात. यामध्ये काही महिला विवाहित असून त्यांचे पती, मूलबाळ व पालकसुुध्दा महिलांच्या सोबत आले होते. त्यामुळे भरती प्रक्रिया पूर्ण होईस्तोवर नातेवाईकांना उन्हातान्हात उभे राहावे लागले. काही महिलांचे नातेवाईक अमरावती असल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना आसरा मिळाला. मात्र, काही महिलांचे नातेवाईक भरती प्रांगणाच्या बाहेरील आवारात ताटकळत उभे होते. त्यातच महिलांचे दस्तऐवज तपासणीत त्यांना विवाहित असल्याचे प्रमाणपत्र मागविण्यात आले. मात्र, याची माहिती आधीच न दिल्यामुळे महिला उमेदवारांनी आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड तसेच टीसी, जातप्रमाणपत्र आदी दस्तऐवज काळजीपूर्वक सोबत आणले होते. परंतु विविहित असल्याचे प्रमाणपत्र एकानेही सोबत आणले नव्हते. नेमके त्याच कारणासाठी कोसो दुरून भरतीसाठी आलेल्या महिलांना निराश होऊन परतावे लागले. असाच प्रकार यवतमाळ जिल्ह्यातील बाणगाव येथून आलेल्या एका महिलेसोबत घडला.
पोलीस भरतीदरम्यान भावी महिला पोलिसांची कुचंबणा
By admin | Updated: April 4, 2016 00:48 IST