अमरावती : अचलपूर येथील राष्ट्रीय हायस्कूलचा विद्यार्थी प्रज्ज्वल दिलीप गावंडे याने इयत्ता दहावीच्या परीक्षेत ८४ टक्के गुण प्राप्त केले आहे. तो ग्रामीण भागातील सावळी या छोट्याशा गावातील अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा आहे. अचलपूर तालुक्यातील सावळी बु। येथील दिलीप गावंडे शेती करतात. आई गृहिणी असून त्यांना एक मुलगा, एक मुलगी व वडील असा परिवार आहे. आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने प्रज्ज्वलला शिक्षणासाठी अचलपूरला राहणे शक्य नव्हते. त्यामुळे तो रोज २० किमी अंतर एसटीने प्रवास करून नियमित शाळेत येत होता. दरम्यान कधी बस उशिरा तर कधी अतिगर्दीमुळे त्याला वेळेत शाळेत पोहोचण्यासाठी कमालीची धडपड करावी लागायची. मात्र त्याने शाळेला कधीही दांडी मारली नाही. त्यामुळे नियमित अभ्यासाची आवड होती. शेती व्यवसायावर संसाराचा गाडा चालत असल्याने वडिलांना कामात हातभार लावावा लागायचे. तरीदेखील प्रज्ज्वलने त्याचा मावसभाऊ सुमित बाजड याच्या मार्गदर्शनात नियमित अभ्यास केला. त्यामुळे त्याने इयत्ता दहावीच्या परीक्षेत चांगले गुण प्राप्त केले. या यशाचे श्रेय तो आपल्या आई-वडील, मावसभाऊ सुमित, मुख्याध्यापक व गुरुजनांना देतो. पुढे पॉलिटेक्निकला प्रवेश घेऊन इंजिनीअर होण्याचा मानस त्याने 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केला.
शेतकरीपुत्राची दहावीच्या परीक्षेत भरारी
By admin | Updated: June 10, 2015 00:18 IST