बडनेरा : बदलत्या हवामानात शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले असून पिकांची शाश्वती देणे कठीण झाले. वाढत्या शहरीकरणामुळे ग्रामीण भागात मजुरांची समस्या निर्माण झाली आहे. कौटुंबिक हिस्से वाटण्या, शेतीला लागणारा खर्च व उत्पन्नाचा मेळ बसविणे कठीण होत चालल्याने शेतकऱ्यांनी संरक्षित शेतीवर भर द्यावा, असे आवाहन के.ए.धापके यांनी केले.काटेकोर शेती विकास केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी व कृषी विज्ञान केंद्र (दुर्गापूर)च्या संयुक्त विद्यमाने आयोजित शनिवार-रविवारी आयोजित द्वि-दिवसीय हरितगृह तंत्रज्ञान प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. या शिबिराला संशोधक विजय कानडे, सुनील भंडारे, हेमंत मुजुमदार, सचिन मोरे, दुर्गापूर केंद्राचे प्रफुल्ल महल्ले, के.पी. सिंग, ओ.एल. शेखावत, शरद अवचट प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. पुढे बोलताना धापके म्हणाले, नवीन तंत्रज्ञानाचा शेतीच्या लहान तुकड्यात व्यवस्थित वापर करता येतो. हरितगृह हे उत्कृष्ट तंत्रज्ञान आहे. फुल पिके, भाजीपाला लागवड तंत्रज्ञान व परदेशी भाजीपाला लागवड याविषयी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन मान्यवरांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले. कार्यक्रमाचे संचालन प्रफुल्ल महल्ले तर आभार सचिन पिंजरकर यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रतापराव जायले, विजय शिरभाते, अर्चना काकडे, संतोष देशमुख, किशोर अजबे, सचिन आखरे, सोनल बोंद्रे, दिनकर कामखेडे, लक्ष्मण भजबुजे, ज्ञानेश्वर जिराफे यांनी परिश्रम घेतले. हरितक्रांती तंत्रज्ञान प्रशिक्षण शिबिराला अमरावती, वर्धा, नागपूर, यवतमाळ यासह इतरही जिल्ह्यातील मोठ्या संख्येत शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांना इतर महत्त्वपूर्ण विषयांवर सुध्दा यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. अनेक शेतकऱ्यांनी या विषयावर मार्गदर्शन केले.
शेतकऱ्यांनी संरक्षित शेतीवर भर द्यावा
By admin | Updated: October 27, 2015 00:19 IST