वांझोटे सोयाबीन बियाणे : ४९८ पैकी ७८ प्रकरणांत परतावा; ४२० शेतकरी प्रतीक्षेतगजानन मोहोड - अमरावतीखरीप २०१४ च्या हंगामात उगवणशक्ती नसलेल्या सोयाबीन विषयी ४९८ तक्रारी दाखल झाल्यात. यापैकी फक्त ७८ प्रकरणांत शेतकऱ्यांना रोख किंवा बियाणे स्वरुपात मदत मिळाली. ४२० शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांना ठगविणाऱ्या महाबीज सह अन्य १५ बियाणे कंपन्यांवर कारवाईचा प्रस्ताव कृषी विभागाने कृषी आयुक्तांकडे पाठविला. सर्व प्रकरणे न्यायालयीन कारवाईसाठी पात्र असताना केवळ २१ प्रकरणे न्यायालयात दाखल केले आहे. कृषी विभागाच्या वेळकाढू धोरणामुळे शेतकऱ्यांना ठगविणाऱ्या महाबीजसह अन्य १५ कंपन्यांनी भरपाईसाठी शेतकऱ्यांना ठेंगा दाखविला आहे. जिल्ह्यात उगवणशक्ती नसल्याबाबत सोयाबीनच्या ४९८ तक्रारी दाखल झाल्यात. २७० प्रकरणात तक्रार निवारण समितीने बियाणे सदोष ठरविले आहेत. ९० नमुने प्रयोगशाळेत नापास ठरले. अप्रमाणित बियाण्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. दुबार, तिबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली तरीही निकृष्ट बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर खटले दाखल करण्यास विलंब का? असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. खरीप हंगाम संपला रबीची पेरणी अंतिम टप्प्यात आहे. पंचनामे करणाऱ्या तालुकास्तरीय कृषी अधिकाऱ्यांच्या वेळकाढू धोरणामुळे निकृष्ट बियाण्यांची केवळ २१ प्रकरणे न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत. केवळ २८ शेतकऱ्यांना ४६.५० क्विंटल व क्षेत्र ११४.६० हेक्टरसाठी बियाणे परतावा कंपन्याकडून देण्यात आला आहे तर ५० शेतकऱ्यांना १२२.८ हेक्टर क्षेत्राकरिता ७ लक्ष ३५ हजारांची मदत मिळावी. प्राप्त तक्रारींपैकी किमान १०० प्रकरणे न्यायालयीन कारवाईसाठी पात्र असताना कृषी विभागाने केवळ २१ प्रकरणांत खटले दाखल केले आहे. उर्वरित प्रकरण कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेळकाढू धोरणामुळे प्रलंबित आहे.यंदाच्या खरीप हंगामात उगवणशक्तीची महाबीजदेखील हमी देऊ शकले नाही. किंबहुना निकृष्ट बियाण्यांच्या सर्वाधिक तक्रारी महाबीज कंपनीविरोधात आहे. अन्य १५ कंपन्यांचे बियाणे वांझोटे निघाले. पेरलेले बियाणे मिळाले नाही म्हणून दुबार व तिबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. शेतकऱ्यांनी ज्या कंपनीचे बियाणे पेरले त्या कंपनीच्या बॅग व पावती हा पुरावा सादर करून कृषी विभागाकडे तक्रारी केल्यात. महाबीजचे कृषी अधिकाऱ्यांशी संगनमत सोयाबीनची उगवणशक्ती नसलेल्या बियाणे कंपन्याविषयक सर्वाधिक तक्रारी पूर्णानगर परिसरातील २०० वर शेतकऱ्यांच्या आहे. सोयाबीन बियाण्यांचे प्लॉट क्र. ४०१५, ४०३४ व ४००९ हे वाण क्र. ३३५ चे आहे. बीज प्रमाणीकरण केंद्र परभरी येथील कृषी अधिकाऱ्यांनी या बियाण्यांची उगवणशक्ती ७५ टक्के दर्शविली. हेच बियाणे नागपूर येथील प्रयोगशाळेत केवळ ११ टक्के उगवणशक्तीचे निघाले असल्याने महाबीज व कृषी अधिकाऱ्यांचे संगनमताने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट होते.बॅगच्या टॅगवर ‘त्या’ अधिकाऱ्याची स्वाक्षरीमहाराष्ट्र राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणेच्या कृषी अधिकाऱ्यांची स्वाक्षरी व उगवणशक्तीचा उल्लेख बियाण्यांच्या प्रत्येक बॅगच्या टॅगवर आहे. ७१ टक्के उगवणशक्ती दर्शविलेल्या लॉटमधील बियाण्यांची उगवणशक्ती केवळ ११ टक्केच होती हे नागपूर येथील शासकीय प्रयोगशाळेच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ‘त्या’ कृषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी पूर्णानगर येथील शेतकऱ्यांची मागणी आहे.
बियाणे कंपन्यांचा शेतकऱ्यांना ठेंगा
By admin | Updated: January 6, 2015 22:51 IST