अमरावती : अजंनगाव सुर्जी तालुक्यांतर्गत येणाऱ्या हिरापूर येथील सुमारे ८० शेतकऱ्यांनी वीजवितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात आक्रमक भूमिका घेत भारनियम आणि खंडित वीज पुरवठ्यामुळे शेतीचे झालेल्या प्रचंड नुकसानाची भरपाई वीज वितरण कंपनीने द्यावी, अशी मागणी वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व शासनाकडे निवेदनाव्दारे केली आहे. न्याय न दिल्यास किमान ईच्छामरणाची तरी परवानगी दयावी, अशी मागणी करीत तीव्र भावना शासन व प्रशासनासमोर मांडल्यात. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील हिरापूर गावालगतच्या मौजे पळखेड शेतशिवारातील वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराने बागायती व अन्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले. ओलीत करण्यासाठी पाणी आहे. पण वीजपुरवठा सुरळीत नाही. परिणामी परिसरातील शेती पिके पूर्ण सुकली आहेत. हिरापूर, पळसखेड, निमखेड, चौसाळा, चिंचोना, सावरपाणी, गौरखेड हा बागायती परिसर आहे. या भागातील वीज वितरण कंपनीच्या डी.बी विशेषता पळखेड येथील सहारे डीबीचा पार बोजवारा उडाला आहे. अनेक डीबी ओव्हरलोड झाल्या आहेत. त्यामुळे दर महिन्याकाठी टॉन्सफॉर्मर जळणे ही नित्याची बाब होऊन बसली आहे. बहुतांश डीबी मध्ये तेल नाही. वेळेवर मेन्टेनन्स नाही. याबाबत वेळोवेळी स्थानिक वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिल्यावरही दखल घेतली जात नाही. परिणामी शेतकरी स्वखर्चाने वर्गणी करून आतापर्यंत डीबीची कामे करीत आले. मात्र वीज कंपनी डीबी जळाल्यानंतरही ती दुरूस्ती करण्याबाबत कुठलीही उपाययोजना न करता बघ्याची भूमिका घेत आहे. एवढेच नव्हे, तर उपाय योजनेबाबत वीज कंपनीचे अधिकारी उडवाउडवीचे उत्तरे देऊन शेतकऱ्यांची थट्टा करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकारामुळेच या परिसरातील शेती पिके पूर्ण सुकली आहेत. वीज वितरण कंपनीने या भागात पुरवठयासाठी टाकलेली लाईन ही १९६० सालची आहे. ही लाईन कालबाह्य झाली असताना वारंवार तार तुटण्याचे प्रकार वाढले आहेत. यासंदर्भात कुठल्याही उपाययोजना करण्यासाठी वीज वितरण कंपनी हेतुपुरस्सर डोळेझाक करीत आहे. एकंदरीत झालेल्या शेती पिकांची नुकसान भरपाई द्यावी, याशिवाय सहारे डीबी व अन्य डीबीची दुरूस्ती करावी. याबाबत तातडीने कारवाई करावी अन्यथा शेतकऱ्यांना इच्छामरणाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी राहुल सहारे, अनिल तुमसरे, गोपाल देशमुख यांच्यासह सुमारे ८० शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे निवेदनाव्दारे शुक्रवार ३१ आॅक्टोबर रोजी केली आहे. (प्रतिनिधी)
वीज कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
By admin | Updated: November 1, 2014 22:45 IST