सपन प्रकल्पाचे पाणी इतर तालुक्यांना देण्यास विरोध, सहविचार सभेनंतर कृती, पोलिसांकडून सामंजस्याने हाताळणी
परतवाडा : अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील सपन नदी प्रकल्पातील पाणी इतर तालुक्यांना देण्यास स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. अचलपूर तालुक्यातील मल्हारा, गौरखेडा, धोतरखेडा, एकलापूर येथील शेतकऱ्यांसह अन्य शेतकरीही याकरिता एकत्र आले आहेत.
गौरखेडा येथे ५ एप्रिलला या अनुषंगाने कोरोनाची नियमावली पाळत जवळपास दोनशे शेतकरी एकत्र आले होते. या शेतकऱ्यांनी सहविचार सभेनंतर पाणी वळविण्याकरिता सुरू असलेले खोदकाम थांबविण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी शेतकऱ्यांना समजावत सामंजस्याने परिस्थिती हाताळली. यावर गौरखेडा येथील शेतकऱ्यांनी अचलपूरचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांकडे सोमवारी निवदेन सादर केले.
सपन प्रकल्प निर्मितीत आमच्या जमिनी गेल्यात अन् पाणी दुसऱ्याला कसे? अचलपूर तालुक्यालाच पाण्याची गरज आहे. त्यामुळे धरणातील पाणी पळविण्याचे प्रकार थांबवावे, अशा संतप्त प्रतिक्रिया मल्हाराचे सरपंच नारायण बोरेकार यांच्यासह संबधित शेतकऱ्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या.