अमरावती : शेताच्या बांधावर गाय चराई करताना झालेल्या गावठी बॉम्बच्या स्फोटात एक शेतकरी गंभीर जखमी झाला. ही घटना सकाळी १० वाजताच्या सुमारास विष्णोरी शेतशिवारात घडली. गजानन शेषराव ठाकरे (६० रा. विष्णोरी) असे, जखमीचे नाव आहे.गजानन ठाकरे आपल्या गाई घेऊन सकाळी शेतात चराई करीत होते. त्यांची मुलेही शेतात काम करीत होते. गजानन ठाकरे बांधावर गायी चराई करीत असताना त्यांना बांधावर एक वस्तू आढळून आली. त्यांनी ती वस्तू हाती घेतली असता अचानक त्याचा स्फोट झाला. या स्फोटात गजानन यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या मुलांनी तत्काळ ठाकरे यांना मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारकरिता नेले. तेथे प्राथमिक उपचार करुन त्यांना अमरावती येथील डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तेथून त्यांना सुपर स्पेशालिटी रुग्णालयात नेण्यात आले व नंतर इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले. सद्यस्थितीत गजानन ठाकरे यांच्यावर उपचार इर्विन रुग्णालयात वॉर्ड क्रमांक १६ मध्ये सुरु आहे. मात्र सायंकाळपर्यंत त्यांना सर्जन पाहण्याकरिता आलेले नव्हते, असा आरोप जखमीच्या नातेवाईकांनी केला आहे. (प्रतिनिधी)
गावठी बॉम्बस्फोटात शेतकरी गंभीर
By admin | Updated: February 26, 2015 00:09 IST