मोर्शी : खरीप हंगाम आता तोंडावर आला आहे. बियाणे व खतांची दरवाढ होत असताना शेतमालाच्या बाजारभावात घसरण झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. जून महिन्यात विदर्भात पेरणीला सुरुवात होते. परंतु यंदा पाऊस लांबणीवर पडल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी धावपळ सुरु आहे. काही शेतकरी आपला शेतमाल विकून धान्य खरेदी करण्याच्या तयारीत आहे. परंतु बाजार समितीत बाजारभावात कमालीची घसरण झाल्याने शेतकरी नाराज आहे. वाढती महागाई कमी करण्याची निवडणुकीदरम्यान भाजपक्षाने घोषणा केली होती. दुसरीकडे केंद्र शासनाने महागाई कमी करण्यासाठी काही ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत; तथापि उद्या व्यापाऱ्यांना, कारखानदारांना भाव कमी करण्याची तंबी केंद्र शासनाने दिलीच, आणि भाव कमी करणे भाग पडलेच तर सध्या चढ्या भावाने खरेदी केलेला शेतमाल पुढे स्वस्तात विकावा लागेल. परिणामी नुकसान सहन करावा लागेल या भीतीपोटी व्यापारी वाढीव भावात शेतमाल खरेदी करण्यास टाळत आहे. परप्रांतीय व्यापारी आणि अडत्यांनी शेतमाल खरेदीत हात आखूडता घेतल्याचे अमरावती बाजार समितीतील एका अडत्याने येथील शेतकरी आणि पंचायत समितीचे माजी उपसभापती दिनेश मानकर यांना सांगितले. पार्डी येथील नारायणराव कुकडे यांना आला. त्यांनी दीड एकरात उन्हाळी भुईमुगाचे पीक घेतले. त्यांना १५ क्विंटल भुईमुंगाच्या शेंगा झाल्या. मोर्शी बाजार समितीत शेंगा विकल्या जात नाही. त्यामुळे त्यांनी अमरावती येथील बाजार समितीत भूईमुंग विक्री करीता नेला. तेथे भूईमुंगशेंगांना २१०० रुपये प्रतिव्किंटल भाव मिळाला. गेल्यावर्षी याच कालावधीत जवळपास ३५०० ते ४१०० रुपये प्रती क्विंटल भाव होता. कुकडे यांना भूईमुंगाच्या लागवडीपासून काढणीपर्यंत पाणी आणि विजेचा खर्च, स्वत:ची मजुरी वगळता एकूण ३२ हजार रुपये खर्च आला. अमरावती जिल्ह्यात आधीच भूईमुगाचा पेरा कमी आहे. तरीही भाव मिळत नसल्याने शेतकरी हताश झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)
शेतमालाचे भाव घसरले, शेतकरी चिंतातुर
By admin | Updated: June 14, 2014 23:03 IST