आर्थिक मदतीची आस : वीज कोसळून झाला मृत्यू धामणगाव रेल्वे : वादळी पावसादरम्यान वीज कोसळून एका शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना नजीकच्या निंबोली भोगे येथे घडली़ दरम्यान आ़वीरेंद्र जगताप यांनी मृत शेतकरी कुटुंंबाला भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. शासकीय मदत तातडीने मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. तीन दिवसांपूर्वी तालुक्यात वादळी पाऊस आणि विजेने एका ६५ वर्षीय शेतमजुराचा बळी घेतला़ श्रीराम जाधव असे मृताचे नाव असून धामणगाव येथून बाजार करून निंबोली भोगे गावाकडे परतत असताना वीज कोसळून त्यांचा तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा व विवाहित मुली आहेत़ दररोज मजुरी करून उदरनिर्वाह चालविणाऱ्या या कुटुंबाच्या प्रमुखाचा मृत्यू झाल्याने जाधव कुटुंबावर आघात झाला. शुक्रवारी आ. वीरेंन्द्र जगताप यांनी जाधव कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला़ यावेळी जि.प.अध्यक्ष सतीश उईके, सरपंच पवार, गजानन पांडे, आशिष पवार, समीर कडू आदी उपस्थित होते़ तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आ. वीरेंद्र जगताप यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)
‘त्या’ कुटुंबाला जगताप यांचा धीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2016 00:11 IST