अंजनगाव सुर्जी : स्थानिक आठवडी बाजारातील नगर परिषद व्यापारी संकुलात महाराष्ट्र एटीएम शेजारी असलेल्या सेतू केंद्रावर धाड टाकून तहसीलदार प्रदीप पवार यांनी केंद्र संचालक भूषण नंदकिशोर कुळकर्णी (रा. सुर्जी) याला रंगेहात पकडले. ही घटना शुक्रवारी दुपारी ४.३० वाजता घडली. सबंधित सेतू केंद्रातून जात प्रमाणपत्राच्या स्वाक्षरीबद्दल शंका आल्याने काही नागरीकांनी पडताळणीसाठी हे प्रमाणपत्र तहसील कार्यालयात नेले. तेथे शंका आल्याने ही प्रकरणे पडताळून पाहणारे नायब तहसीलदार महादेव पराते यांनी सदर प्रकरणे तपासली असता त्यावर स्टॅपलर, हुकाचा वापर केला नव्हता. व टॅगही लावला नव्हता. तहसील पडताळणीच्या स्वाक्षऱ्या व खुना नसताना थेट उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी यांच्या स्वाक्षरीच्या हुबेहुब नकला केलेले प्रमाणपत्र आरोपीने तयार केले व त्यावर सेतू केंद्राचा जावक क्रमांकही टाकला. प्राथमिक तपासणी अंती प्रथमेश त्र्यंबक गिरनाळे (कापूसतळणी), सुकेशिनी प्रमोद हरणे, अजय मोहन वानखडे मुुऱ्हादेवी आणि शुभम मोहन भटकर मुऱ्हादेवी ही चार प्रमाणपत्रे आरोपी जवळून जप्त करण्यात आली. आरोपीला गुन्हा कबूल करण्यासाठी बराच प्रयत्न करावा लागला. हे काम आपण केले नसून कोतवालाने केले असा प्रथम सूर लावणाऱ्या आरोपीने शेवटी गुन्हा कबूल केला. तहसीलदारांनी तातडीने उर्वरित कागदपत्रे व शिक्के सदर सेतू केंद्रातून ताब्यात घेतले व नायब तहसीलदार पराते यांनी केंद्राला सील ठोकले. सदर प्रमाणपत्रांमध्ये जे शिक्के मारले त्यात चिंचोली येथील एका सहकाऱ्याचे नाव सांगितल्यामुळे पोेलीस त्याच्या शोधात चिंचोलीला गेले. उपविभागीय अधिकारी ईब्राहीम चौधरी नुकतेच दर्यापुरला रुजू झाले व ४ आॅगस्ट पासून कालपर्यंत सुटीवर होते. या कालवधीत त्यांचा कार्यभार तहसीलदार प्रदीप पवार यांचेकडे होता. या काळात तब्बल सहाशे प्रमाणपत्र वितरित केले. सेतू केंद्रातून प्राप्त प्रमाणपत्रे तहसील कार्यालयातून पडताळून घ्यावीत, असे आवाहन तहसीलदारांनी केले आहे.
अंजनगावच्या सेतू केंद्रात बनावट स्वाक्षऱ्यांची प्रमाणपत्रे
By admin | Updated: August 9, 2014 00:40 IST