डफरीनमधील बालमृत्यू प्रकरण : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल अमरावती : नवजातांच्या मृत्यूप्रकरणी डफरीन रूग्णालय प्रशासनाने घेतलेली बचावात्मक भूमिका आणि लोकप्रतिनिधींची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचे पुराव्यासहित वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर जिल्हा प्रशासनानेदेखील याप्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. याप्रकरणाबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांसोबत सविस्तर चर्चा करून चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले जातील, असे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी सांगितले. जिल्हा स्त्री रूग्णालयातील अनागोंदीबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने अनेकदा प्रकाशित केले आहे.दोषींवर कारवाई होणार‘नवजाताचा पलंगावरून पडून मृत्यू’ या मथळ्याखाली बातमी प्रकाशित होताच आमदार सुनील देशमुख यांनी रूग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी रूग्णालय प्रशासनाने बचावात्मक पवित्रा घेऊन आमदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. जिल्हाधिकारी वैद्यकीय अधीक्षकांसोबत चर्चा करून प्रकरणाच्या सविस्तर चौकशीसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची समिती नेमणार आहेत.-तर माझे बाळ वाचले असते!पोटात बाळ दगावलेल्या रिझवाना बी यांच्याशी पुन्हा संवाद साधला असता त्या म्हणाल्या की, वेळेत उपचार मिळाले असते तर माझे बाळ वाचले असते. त्यांनी प्रसूतीपूर्वी अंबादेवी संस्थानमध्ये सोनोग्राफी केली असता त्यांचे बाळ पायाळू असल्याचे कळले होते. त्यामुळे रूग्णालयात दाखल झाल्यानंतर डॉक्टरांना प्रसूती करण्यासाठी अनेकदा कळकळीची विनंतीसुद्धा केली. पण, डॉक्टरांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
तज्ज्ञ डॉक्टरांची चौकशी समिती नेमणार
By admin | Updated: November 15, 2014 22:38 IST