अंदाज : ५ जूृनला केरळात मान्सूनचे आगमनअमरावती : पुढील चार दिवसांत विदर्भात बहुतांश भागात पाऊस पडण्याची शक्यता असून ५ जून रोजी केरळात मान्सून दाखल होण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. त्यामुळे लवकरच उन्हाळ्यातील तप्त वातावरणातून नागरिकांची सुटका होण्याचे संकेत दिसत आहेत. उन्हाळ्याच्या शेवटी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना थोडा दिलासा मिळाला होता. मात्र, मागील काही दिवसांपासून ऊन, ढगाळ वातावरण व तुरळक पावसाने उकाडासुध्दा वाढविला आहे. दोन दिवसांपूर्वी ४५ ते ४६ डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान गेल्याने उन्हाच्या झळांचा सामना नागरिकांना करावा लागला. मात्र, सोमवारपासून तापमान ४१ डिग्रीवर आल्याने उन्हाच्या झळांपासून थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र, कमी तापमानातही उकाडा कायम असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. आता नागरिक मान्सूनची प्रतीक्षा करीत असून ती प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. ३ ते ६ जून दरम्यान विदर्भातील बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उत्तर मध्यप्रदेश, मध्य पाकिस्तान, राजस्थान, लक्षदीप व बंगालच्या उपसागरावर चक्राकार वारे वाहत आहे. यामुळे विदर्भातील बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी दिली. (प्रतिनिधी)
आगामी चार दिवस मान्सूनपूर्व पावसाचे
By admin | Updated: June 3, 2015 00:31 IST