गुन्हे शाखेची कामगिरी : २४ गुन्ह्यांची कबुली अमरावती : अनेक महिन्यांपासून शहरात मंगळसूत्र हिसकावण्याच्या घटना घडत होत्या. मात्र, पोलिसांना आरोपींपर्यंत पोहोचणे शक्य झाले नव्हते. अखेर मंगळवारी चेनस्नॅचर्सला पकडण्यात पोलिसांना यश मिळाले असून गुन्हे शाखेच्या पथकाने ही कामगिरी बजावली. मंगळवारी पोलिसांनी चार युवकांना अटक केली. त्यांनी शहरातील २४ गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्याजवळून चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत २० मार्च रोजी दुपारी २.३० वाजता बोकडे नामक महिलेचे अज्ञात युवकांनी सातुर्णा परिसरातून मंगळसूत्र हिसकावले होते. त्यावेळी पोलिसांनी शहरात नाकाबंदी करून दोन युवकांना ताब्यात घेतले होते. तेव्हापासून गुन्हे शाखेच्या पथक मंगळसुत्र चोरांच्या पाळतीवर होते. मात्र, यावेळी मोमीन नावाचा आरोपी पसार झाला होता. गुप्त सुचनेवरून पोलिसांनी मंगळवारी मोमीनला अकोला येथून अटक करून अमरावतीत आणले. त्यांची चौकशी केली असता त्याने आपले नाव मोमीन खान हबीब खान (२७, रा. जनता कॉलनी, हबिबनगर) असल्याचे सांगितले. मोमीन हा आरटीओ कार्यालयात एजन्टचे काम करीत असल्याची माहिती पोलिसांपुढे आली. पोलिसांनी मोमिन खान यांची कसून चौकशी केली असता त्याने अन्य साथीदारांची नांवेसुध्दा पोलिसांना सांगितले. त्यांच्या माहितीच्या आधारे पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे, नितीन पवार यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, सहायक पोलीस निरीक्षक कांचन पांडे, पठाण, पोलीस उपनिरीक्षक पाटील, एएसआय दिलीप वाघमारे, पोलीस शिपाई जगदीश पाली, बाळापुरे, नाना नरवने, चैतन्य रोकडे, अशोक वाटाणे, पप्पू वडनेरकर, सुभाष पाटील, शंकर बावनकुळे, नीलेश जुनघरे, अक्षय देशमुख, अमोल खंडेझोड, नईम बेग व दीपक श्रीवास यांनी चारही आरोपींना अटक केली. आरोपींमध्ये वसीम खान ऊर्फ बबलू वल्द इसूफ खान (२९,रा. अन्सारनगर), रोशन विनायक रोहनकर (२,रा. रविनगर), सागर जनार्धन गोगटे (२७,रा. तुळजागिर वाडा, गांधी चौक) व सोने विकणारा याचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपीजवळून गुन्ह्यात वापरलेल्या चार दुचाकी जप्त केल्या असून आरोपींकडून आणखी काही गुन्ह्यांत दुचाकी आढळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. (प्रतिनिधी)
अखेर चेनस्नँचर्स अटकेत
By admin | Updated: April 5, 2016 23:57 IST