विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान : पाच टक्के गुणांची तफावत अमरावती : तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०१६-१७ संदर्भात तंत्र शिक्षण संचालनालयाने नुकतेच नोटिफिकेशन जाहीर केले आहे. परंतु या नोटिफिकेशनमध्ये बऱ्याच त्रुटी असल्याचा आरोप विद्यार्थी व पालकांनी केला आहे. या त्रुटीपूर्ण नोटिफिकेशनमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने मागील वर्षी महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था अधिनियम २०१५ पारित केला. त्यातील तरतुदीनुसार आता प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. त्या अनुषंगाने डीटीईने इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग अँड टेक्नालॉजी (लेटरल टू एन्ट्री टू सेकंड इअर), फॉर्मसी, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट अॅन्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी व डिप्लोमा इंजिनीयरिंग अॅन्ड टेक्नालॉजी या सहा प्रोग्रामाबद्दल नोटिफिकेशन दिले आहे. यात अभ्यसक्रमाचा कालावधी, पात्रता निकष जाहीर करण्यात येत आहेत. यात अनेक त्रुटी असल्याचा आरोप होत आहे. तंत्रशिक्षण क्षेत्रातील एआईसीटीई ही सर्वोच्च संस्था आहे. डीटीई ही राज्यस्तरावर काम करते. मात्र, इंजिनीअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी या चार वर्षीय अभ्यासक्रमात प्रवेशाची पात्रता एआयसीटीईने ४५ टक्के गुण अशी ठरविली असताना डीटीईने मात्र हीच पात्रता ५० टक्के गुणांवर पोहोचविली आहे. भौतिकशास्त्र आणि गणित विषय घेऊन १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्याने रसायनशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जीवशास्त्र आणि टेक्निकल व्होकेशनल यापैकी एका विषयात ४५टक्के गुण ‘एआय सीटीई’ने अनिवार्य केले आहेत. डीटीईने यापैकी कुठल्याही एका विषयात ५० टक्के गुण अनिवार्य हा निकष ठरविला आहे. एआयसीटीई आणि डीटीई या उभय संस्थांनी प्रवेशपात्रतेसंदर्भात घातलेला हा घोळ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याला ग्रहण लावणारा आहे. याशिवाय या नोटिफिकेशनमध्ये अन्य त्रुटीसुद्धा आहेत. एआयसीटीई आणि डीटीईने पात्रतेत घातलेली पाच टक्क्यांची तफावत विद्यार्थ्यांना मारक ठरणारी असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
‘डीटीई’च्या नोटिफिकेशनमध्ये त्रुटी!
By admin | Updated: June 1, 2016 00:42 IST