अमरावती : राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी इयत्ता दहावी, बारावी परीक्षेच्या संभावित तारखा घोषित करताच सोमवारी नववी ते बारावीपर्यंतच्या शाळांमध्ये रेलचेल वाढली. मात्र, शाळा सुरू हाेऊन ४२ दिवस झाले असताना आतापर्यंत एकही विद्यार्थी संक्रमित आढळून आला नाही, ही शिक्षण विभागासाठी जमेची बाजू मानली जात आहे.
राज्य शासनाने नववी ते बारावीपर्यंत शाळांचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू केले. शाळा सुरू करताना कोरोना नियमावलींचे पालन अनिवार्य होते. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी करण्यात आली. शाळेत
विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक अंतर, मास्कचा वापर, नियमित हात धुणे, गर्दी होणार नाही याची दक्षता शिक्षक,
मुख्याध्यापक घेत आहेत. परिणामी ४२ दिवसांत शाळांमध्ये एकाही विद्यार्थ्याला कोरोना संसर्गाची लक्षणे
दिसून आली नाहीत. जिल्ह्यात नववी ते बारावीपर्यंतचे १,३९,९०२ विद्यार्थी असून, २१,७५० विद्यार्थी उपस्थिती आहे. अचलपूर तालुक्यात सर्वाधिक ७५ शाळा सुरू झाल्या आहेत.
--------------------------
जिल्ह्यातील नववी ते बारावीचे वर्ग असलेल्या शाळा- ७४९
एकूण विद्यार्थी- १३९९०२
विद्यार्थ्यांची उपस्थिती - २१७५०
---------------------
दहावी, बारावी परीक्षांच्या संभावित तारखा जाहीर होताच सोमवारपासून शाळांमध्ये गर्दी वाढली. परीक्षांविषयी पालकांमध्ये जागृती होत असल्याचे चित्र आहे. विद्यार्थी आता ऑनलाईनपेक्षा ऑफलाईन शिक्षणाला प्राधान्य देत आहेत. ग्रामीण भागातील शाळांमध्ये गर्दी होत आहे.
- वामन बोलके, शिक्षणाधिकारी, माध्यमिक अमरावती.
----------------------
१५.५४ टक्के विद्यार्थी उपस्थित, संक्रमित नाहीच
जिल्ह्यात नववी ते बारावीपर्यंतचे १,३९,९०२ विद्यार्थी असून, २१,७५० विद्यार्थी उपस्थितीची नोंद आहे. शाळांमध्ये विद्यार्थी उपस्थितीची ही टक्केवारी १५.५४ एवढी आहे. २३ नोव्हेंबर २०२० ते ४ जानेवारी २०२१ या दरम्यान सुरू झालेल्या ६६८ शाळांमध्ये एकही विद्यार्थी संक्रमित आढळून आला नाही. त्यामुळे पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्याची मानसिकता तयार केली आहे.
----------------------