अमरावती : शहरातील मॉल्स, हॉटेल्स्, संकुलातून गायब झालेले वाहनतळ शोधून काढण्यासाठी पोलीस व महापालिका आयुक्तांनी संयुक्त मोहीम हाती घेतली आहे. याच श्रुंखलेत शुक्रवारी येथील बसस्थानक मार्गालगतच्या हॉटेल रामगिरीने गिळंकृत केलेले वाहनतळाचे अतिक्रमण तोडण्याची कारवाई करण्यात आली. वाहनतळ गायब झालेली ३५ प्रतिष्ठाने पहिल्या टप्प्यात असल्याची माहिती आहे.महापालिका आयुक्त अरुण डोंगरे, पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांनी शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेण्यासाठी पाऊल उचलले आहे. ज्या प्रतिष्ठानांच्या संचालकांनी बांधकाम मंजुरीच्या वेळी वाहनतळ असल्याचे नमूद केले होते, कालातंराने ही वाहनतळ गिळंकृत झालीत, अशी हॉटेल्स, मॉल्स, मंगल कार्यालये, संकुलाची शोधमोहीम सुरु हाती घेण्यात आली आहे. ज्या व्यावसायिकांनी वाहनतळ गायब केले आहे, अशांना नोटीस बजावून वाहनांसाठी वाहनतळ उपलब्ध करुन देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आठ दिवसांच्या आत वाहनतळ खुले झाले नाही तर मूळ नकाशा शोधून गडप केलेले वाहनतळ शोधण्यासाठी अतिक्रमण तोडले जाईल, असे कारवाईचे स्वरुप आहे. ज्या व्यावसायिकांनी वाहनतळाची जागा सोडली; मात्र वाहनतळाचे फलक लावले नाही त्या व्यावसायिकांना वाहनतळाचे फलक लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हॉटेल्स, प्रतिष्ठाने, मॉल्स, मंगल कार्यालये आदींसमोर वाहने उभी असल्यास यापुढे ती वाहने वाहतूक पोलीस ताब्यात घेतील, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. अतिक्रमण पथक कारवाईसाठी जाताना त्या प्रतिष्ठानचे मूळ नकाशे सोबत ठेवत असल्याची माहिती आहे. शुक्रवारी झालेल्या कारवाईत गंगाप्रसाद जयस्वाल, हेमंत महाजन, घनशाम वाघाडे, अजय विंचूरकर, गणेश कुत्तरमारे, उमेश सवाई आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)मंगल कार्यालय, लॉन संचालकांना नोटीसशहरात अव्वाच्या सव्वा दरात रक्कम आकारुन सुरू असलेले मंगल कार्यालये, लॉन संचालकांनी वाहनतळे गायब केल्याचे चित्र आहे. त्यामुळे कार्यक्रमासाठी येणाऱ्यांची वाहणे रस्त्यावरच उभी केली जातात. हा प्रकार सर्वच मंगलकार्यालये, लॉनबाबत लागू होत आहे. वाहनतळाची जागा सोडल्याशिवाय मंजुरी कशी मिळाली,ही शोधमोहीम सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यात संकुलविरोधात कारवाईशहरात संकुले बांधकामाची परवानगी मिळविताना नकाशात वाहनतळाची जागा सोडण्याचे अंकित करण्यात आले होते. मात्र कालांतराने संकुलाच्या संचालकांनी वाहनतळाच्या जागेवर नव्याने गाळे निर्माण करुन त्या विकण्याचा धंदा चालविला आहे. परिणामी दुसऱ्या टप्प्यात वाहनतळाची शोध मोहीम सुरू होईल, अशी माहिती नगररचना विभागाने दिली आहे.या प्रतिष्ठांनाचे अतिक्रमण तोडणारवाहनतळाची जागा गायब करणाऱ्या ३५ प्रतिष्ठांनाची यादी तयार केली आहे. ज्यांनी वाहनतळाची जागा गिळंकृत केली अशा प्रतिष्ठांना नोटीस बजाखवली आहे. येत्या काही दिवसांत शिवाजी कमर्शियल कॉम्प्लेक्स, आॅयकॉन मॉल्स, ग़्रॅण्ड महेफिल, लढ्ढा मॉल्स, ईगल हॉटेल्स, सिटी कोतवाली पोलीस ठाण्यासमोरील संकुलातील वाहनतळांची शोधमोहीम घेत अतिक्रमण हटविले जाणार असल्याची माहिती आहे.
‘रामगिरी’चे अतिक्रमण तोडले
By admin | Updated: January 3, 2015 00:26 IST