महापालिका : महिनाभरात रिझल्ट न मिळाल्यास याद राखा !अमरावती : शहराला शिस्त लागलीच पाहिजे. निवडणुका डोळ्यासमोर आहेत, म्हणून कारवाई थांबवू नका. अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणावर कठोर कारवाई करा आणि महिनाभरात शहर अतिक्रमणमुक्त करा, असे कडक निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिलेत. सोमवारी पालकमंत्र्यांनी महापालिका सभागृहात आढावा बैठक घेतली. बैठकीला आयुक्त हेमंत पवार, महापौर रीना नंदा, जिल्हाधिकारी किरण गित्ते, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांची उपस्थिती होती. चित्रा चौक ते इतवारा भागासह शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे वाढल्याचे निरीक्षण नोंदवीत अतिक्रमणधारकांच्या गाड्या जप्त करा, लोकप्रतिनिधींचे फोन अटेंड करू नका, महिनाभरात प्रभावी कामगिरी करा, अन्यथा त्यानंतर पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले जातील, असा इशारा पोटे देत अवैध बांधकाम तोडून टाकण्याचे सक्त निर्देश त्यांनी दिलेत. याशिवाय हॉकर्स झोनमध्ये मक्तेदारी खपवून घेतली जाणार नाही. फेरीवाल्यांसाठी जागा निश्चित करुन ताबडतोब निर्णय घ्या. एका फेरीवाल्याला एकच परवाना द्या आणि चारचाकी हातगाडीलाच परवानगी देण्याच्या सूचना त्यांनी केल्यात. यात महापालिका अधिकाऱ्यांनी लुडबूड करू नये, अन्यथा कारवाईचा बडगा उगारु, असा गर्भित इशाराच त्यांनी यावेळी दिला. शहरात ४१२१ फेरीवाले असून त्यापैकी १६५३ फेरीवाल्यांनी आवश्यक ती कागदपत्रे पुरविल्याने त्यांच्यासाठी जागा निश्चितीचा मार्ग प्रशस्त झाल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. त्यावर आता ज्याठिकाणी ते व्यवसाय करीत असतील तेथेच फेरीवाल्यांना जागा देण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. फेरीवाल्यांना निश्चित जागा द्या, मात्र तेथे त्यांची मक्तेदारी होणार नाही, याची काळजी घेण्याचेदेखील त्यांनी सुचविले. याशिवाय पंतप्रधान आवास योजना, नवाथे मल्टिप्लेक्स, शिवटेकडी-भीमटेकडीचे सौंदर्यीकरण, दलितवस्ती सुधारणा, करमूल्यांकन या बाबींचाही त्यांनी आढावा घेतला. घनकचरा व्यवस्थापनातून महापालिकेला मोठा आर्थिक लाभ होईल. त्यादृष्टीने प्रस्ताव तयार करा, केबलिंग आणि भुयारी गटार योजनेसाठी खोदलेल्या खड्ड्यांच्या समस्येवरही अंकुश ठेवण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिलेत. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत खासगी बांधकाम व्यावसायिकांनाही प्रकल्पात समाविष्ट करावे व ही योजना यशस्वीपणे राबवावी, याशिवाय मालमत्ताकरवाढीचा प्रश्न प्रशासन आणि नगरसेवकांनी एकत्र येऊन सोडवावा, शहरातील प्रत्येक मालमत्तांवर सॅटेलाईट सर्वेक्षणाच्या आधारे कर लावण्यात यावा, लोकसहभागातून चौक आणि रस्ता दुभाजकांच्या सौंदर्यीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून ते सगळीकडे एकसारखे असावे, असे आयुक्तांनी सांगितले. (प्रतिनिधी)मोजकेच नगरसेवक उपस्थित आढावा बैठकीला मोजकेच नगरसेवक उपस्थित होते. त्यात प्रवीण हरमकर, नीलिमा काळे, रफ्फू पत्रकार, संजय अग्रवाल, मंजूषा जाधव, छाया अंबाडकर, दिनेश बूब, बबलू शेखावत, चेतन पवार, धीरज हिवसे, विलास इंगोले आदींचा समावेश होता. - तर सर्व नगरसेवकांनी भाजपात यावे ताबडतोब निधी हवा असल्यास सर्व नगरसेवकांनी भाजपात यावे आणि सर्वांनी पुढील निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढवावी, अशी खुली आॅफर पालकमंत्र्यांनी दिली. त्यांच्या या कोपरखळीने सभागृहात हास्याची कारंजी उडाली.ना.गडकरी निधी देण्यास तयार पार्किंगच्या प्रश्नाबाबत ना. नितीन गडकरी गंभीर आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी मल्टिलेव्हल पार्किंग सिस्टीम उभारली पाहिजे. त्यासाठी गडकरी निधी देण्यास तयार आहेत. त्या दृष्टीने महापालिकेने प्रस्ताव द्यावा, अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली. त्यावर टाऊन हॉल आणि गांधी चौकातील ६५०० सक्वेअर फूट जागेची यासाठी पाहणी केल्याची माहिती आयुक्त पवार यांनी दिली. यावर केवळ पाहणी आणि नियोजन करू नका, महिनाभरात रिझल्ट द्या, अशी सूचना पोटे यांनी आयुक्तांना केली.
अतिक्रमण : पालकमंत्री भडकले
By admin | Updated: July 5, 2016 00:50 IST