अकोला : प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निकष धाब्यावर बसवित मोर्णा नदीच्या पात्रात वीट भट्टय़ांचे जाळे पसरले. या प्रकारामुळे नदी पात्रात अतिक्रमण होण्यासोबतच नागरी वस्त्यांनादेखील धोका निर्माण झाला आहे. ही बाब गुरुवारी सकाळी प्रभारी आयुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्या लक्षात येताच, वीट भट्टय़ांचे अतिक्रमण काढावेच लागेल, अशी रोखठोक भूमिका त्यांनी घेतली. जुने शहरातील हरिहर पेठ, दगडी पूल, गुलजारपुरा भागातून वाहणार्या मोर्णा नदीच्या पात्रात मोठय़ा प्रमाणावर वीट भट्टय़ा उभारण्यात आल्या. वीट भट्टय़ांतून निघणार्या धुरामुळे परिसरातील रहिवासी नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. शिवाय, नागरी वस्ती व त्यात भरीस भर नदीच्या पात्रात भट्टय़ा उभारण्यात येऊन, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निकष पायदळी तुडविण्यात कोणतीही कसर ठेवण्यात आली नसल्याचे दिसते. हरिहर पेठस्थित इदगाह परिसराची पाहणी करण्यासाठी २४ जुलै रोजी सकाळी प्रभारी आयुक्त दयानंद चिंचोलीकर मोर्णेच्या पात्रात गेले असता, हा धक्कादायक प्रकार त्यांना दिसून आला. यावर त्यांनी तडक महसूल विभागासह प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संबंधित अधिकार्यांसोबत चर्चा केली. यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाने नदी पात्रातील वीट भट्टय़ांमुळे प्रदूषण व पर्यावरणाची हानी होत असल्याचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला यापूर्वीच दिल्याची माहिती समोर आली. वीट भट्टय़ांसंदर्भात चिंचोलीकर यांची भूमिका लक्षात घेता, भट्टय़ा हटणार असल्याचे दिसून येते.
मोर्णा नदीच्या पात्रात वीटभट्टय़ांचे अतिक्रमण
By admin | Updated: July 26, 2014 20:57 IST