मानधन रखडले : आॅक्टोबरपासून ४०० कामगार वेतनाविना अमरावती : महापालिका आस्थापनेवर असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पोटावरही संक्रांत कोसळली आहे. नियमित आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांच्या तुलनेत कंत्राटींचे तुटपुंजे मानधन रखडल्याने त्यांची दैनावस्था झाली आहे. नियमांना फाटा देऊन केवळ पोटासाठी काम करणारे व केव्हाचीच पन्नाशी केव्हाचीच गाठलेले सुरक्षारक्षक तर डोळ्यांत प्राण आणून अल्पमानधनाची प्रतीक्षा करीत आहेत. सुरक्षारक्षक, संगणक आॅपरेटर आणि अन्य ४०० हून अधिक कंत्राटी कामगारांना आॅक्टोबरपासून वेतन मिळालेले नाही. काही सुरक्षारक्षक तर सप्टेंबरचेच मानधन अद्याप मिळाले नसल्याची खंत व्यक्त करतात. हातावर पोट असणारे हे कंत्राटी कर्मचारी महापालिका आयुक्तांकडे आशाळभूत नजरेने पाहात आहेत. मात्र, महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता त्यांनाही मर्यादा आल्या आहेत. पदभरतीवर बंदी असल्याने महापालिकेने ‘रूटीनवर्क’ साठी एजन्सीची मदत घेऊन त्यांचेकडून मानधनतत्वावर कंत्राटी कर्मचारी घेतले आहे. यात १७८ सुरक्षा रक्षकांसह ७५ च्या आसपास संगणक परिचालक, स्वास्थ्य निरीक्षक, शिपाई, बागवान, गवंडी, निवृत्त लेखाधिकारी व अन्य काहींचा समावेश आहे. सुरक्षा रक्षकांना महिन्याकाठी ८७२६ रूपयांच्या तुलनेत पाच-साडेपाच हजार रूपये मिळतात, संगणकचालकांना महिन्याकाठी ६,५०० रूपये व अन्य कर्मचाऱ्यांना ५ ते कमाल १० हजार रूपये एजन्सीकडून दिले जातात. मात्र, अनेकदा एजन्सीधारकांकडून देयके सादर करण्यास उशीर होत असल्याने निश्चित तारखेला मानधन दिले जात नाही. आयुक्तांनीच व्हावे उदार तीन महिन्यांचे मानधन न मिळाल्याने सुरक्षा रक्षक, संगणक आॅपरेटर व अन्य कामगार - कर्मचाऱ्यांची आर्थिक विपदा कोसळली आहे. हातावर पोट असलेल्या या कर्मचाऱ्यांप्रती आता आयुक्तांनीच उदार व्हावे, अशी अपेक्षा त्यांच्यातून व्यक्त होत आहे. घर चालवायचे कसे ? आमच्या पाच साडेपाच हजारावर घर चालत. पण, तीन महिन्यांपासून तेही मिळत नसल्याने घर चालवायचे तरी कसे, हासुरक्षारक्षकांचा प्रश्न मानधनापलिकडची वास्तविकता जाणवून देणारा आहे. सुमारे ७५ च्या घरात असलेल्या संगणक आॅपरेटर्सना आॅक्टोबरपासून मानधन मिळाले नाही. हाती येणाऱ्या ६,५०० रुपयांमध्ये घरखर्च चालवायचा, दुचाकीत पेट्रोल टाकायचे, असा यक्षप्रश्न असताना तुटपुंजे मानधनही न मिळाल्याने संगणक आॅपरेटर बेसहारा झाले आहेत.
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पोटावर संक्रांत !
By admin | Updated: January 7, 2017 00:10 IST