प्रवीण पोटे : आदिवासींच्या जगण्यात मधाचा गोडवाअमरावती : जंगलात आग्या माश्यांच्या वसाहतीमधून नैसगिकरित्या तयार होणाऱ्या मधात औषधी गुण अधिक प्रमाणात असतात. तसेच या मधाला इतर पद्धतीने तयार होणाऱ्या मधापेक्षा जास्त किंमत मिळते. याचा अभ्यास करुन महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाने मेळघाटातील जंगलामध्ये पारंपारिक पद्धतीने मध गोळा करणाऱ्या आदिवासींना शास्त्रोक्त प्रशिक्षण दिले. विशेष म्हणजे सिपना महाविद्यालयाच्या सहकार्याने चिखलदरा येथे विदर्भस्तरीय मधसंकलन व प्रक्रिया केंद्राचा शुभारंभ करुन मेळघाटमधील मधाला ‘वाईल्ड हनी’ अशी नवी ओळख निर्माण करुन दिली आहे. या ‘वाईल्ड हनी’ मुळे आदिवासींच्या जीवनात निश्चितच गोडवा निर्माण होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले. खादी ग्रामोद्योग मंडळाने मेळघाटमधील २०० गावांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात स्थानिक आदिवासी पारंपारिक पद्धतीने मध संकलन करीत असल्याचे आढळून आले. पारंपारिक पद्धतीने गोळा केलेल्या मधापासून १० टनापर्यंत उत्पादन मिळते. त्यामुळे चिखलदरा व धारणी या दोन तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासींना रोजगार उपलब्ध करुन देण्यासोबतच निसर्गातील मधमाशांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने खादी व ग्रामोद्योग मंडळाने पहिला टप्प्यात येथील ५० आदिवासींना शास्त्रोक्त प्रशिक्षण दिले. शास्त्रोक्त पध्दतीने मध संकलन करणाऱ्या आदिवासींकडून निश्चित दरानुसार व मानकानुसार मंडळाने मध संकलित करण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत ३०० किलो मध संकलित केले आहे. सिपना महाविद्यालयात मधुमक्षिका पालनावर पदवी अभ्यासक्रम चालविला जातो. शास्त्रशुध्द प्रशिक्षणासाठी महाविद्यालयात मध प्रक्रिया युनिट सुरु आहे. सिपना महाविद्यालयाच्या सहकार्याने या प्रक्रिया युनिटचा उपयोग खादी ग्रामोद्योग मंडळ आदिवासींनी संकलित केलेल्या मधावर प्रक्रिया करण्यासाठी करणार आहे.शेतात मधपेट्या ठेवल्यास मधमाशांमुळे मोठ्या प्रमाणात परागीभवन होवून शेती उत्पादनात ५ ते ४० टक्केपर्यंत वाढ होवू शकते. चिखलदरा येथे मधसंकलन व प्रक्रिया केंद्र सुरु केल्यामुळे विदभार्तील मधपाळ शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.- प्रदीप चेचरे,जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी चिखलदरा येथे मधसंकलन व प्रक्रिया केंद्र सुरु केल्यामुळे मेळघाटमधील आदिवासी बांधवाना मोठा रोजगार उपलब्ध होईल. मध उद्योगाचा विस्तार करण्यासाठी आणि मेळघाटमधील मधाचे मार्केटिंग करण्यासाठी शासन निश्चित मदत करेल.-प्रवीण पोटे, पालकमंत्री
मधसंकलन प्रक्रिया केंद्रामुळे रोजगार निर्मिती
By admin | Updated: March 2, 2017 00:07 IST