खुल्या जागेतील अतिक्रमण : नगराध्यक्ष करणार चौकशीची मागणीसुमित हरकुट चांदूरबाजारस्थानिक नगरपालिकेच्या कृपेने पालिकेच्या हद्दीतील खुल्या जागेवरच अतिक्रमण सुरू आहे. एकीकडे अतिक्रमण करू नका, असा नारा पालिका लावते, तर दुसरीकडे खुल्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांना विद्युत पुरवठ्याकरिता नाहरकत प्रमाणपत्र देते. त्यांच्याकडून करवसुली करून अतिक्रमणधारकांना योजनांचा लाभ देण्याचा गोरखधंदा सुरू आहे. अतिक्रमण काढण्यासाठी मोहीम राबविणे पालिकेचे कर्तव्य आहे. असे असताना वॉर्ड क्र. २ मधील उदय कॉलनीजवळील हिंदू स्मशानभूमिला लागून असलेल्या खुल्या जागेवर अतिक्रमितांकडून कर आकारणी केली जात आहे. या अतिक्रमितांना विद्युत जोडणी करण्याकरिता नाहरकत प्रमाणपत्र दिल्याने या खुल्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. ही खुली जागा सुमारे ४० हजार चौरस फूट असून ती नगरपालिकेच्या मालकीची आरक्षित जागा आहे. चांदूरबाजार शहरात हिंदू व मुस्लिम नागरिकांसाठी वेगवेगळ्या दोन-दोन स्मशानभूमी आहेत. मात्र शहरात ख्रिश्चन बांधवांची संख्या मोठी असून या समाजाच्या नागरिकांकरिता कोणतीच स्मशानभूमी उपलब्ध नाही. नाईलाजास्तव या समाज बांधवांना दफनविधीनजीकच्या ग्रामीण भागात नेऊन करावा लागतो. यामुळे ख्रिश्चन बंधूंनी नगरपालिकेला ख्रिश्चन स्मशानभूमिकरिता जमिनीची मागणी केली होती. मात्र तत्कालीन सत्ताधारांनी स्मशानभूमीकरिता जमीन देण्याचे नाकारले. मात्र हिंदू स्मशानभूमिलाच लागून पालिकेची सुमारे ४० हजार स्क्वेअर फुटाची खुली जागा आहे. याच भागात सर्वाधिक ख्रिश्चन समाजाचे नागरिक अनेक वर्षांपासून राहत आहेत. तरीही या ख्रिश्चन समाजाच्या नागरिकांना स्मशानभूमिकरिता जागा उपलब्ध करून देण्यात पालिका प्रशासन हेतुपुरस्सर टाळाटाळ करीत असल्याचा आरोप ख्रिश्चन बांधवांतर्फे होत आहे.अनेक वर्षांपासून ख्रिश्चन बांधवांतर्फे उदय कॉलनी परिसरातील खुल्या जागेत स्मशानभूमीकरिता मागणी करूनही त्यांना जागा देण्यात आली नसून याच जागेवर काही नागरिकांनी अतिक्रमण करून घरे उभारली आहेत. अंदाजे ३० अतिक्रममित घरे या परिसरात उभी झाली असून यावर पालिका प्रशासनातर्फे कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही. उलट पालिकेतील काही कर्मचाऱ्यांनी या प्रकरणात हात ओले करून करवसुली केली. तसेच अनेकांना विद्युत जोडणीकरिता नाहरकत पत्रे वाटण्यात आली. मागील २-३ वर्षांत या खुल्या जागेत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. या अतिक्रमणधारकांना विद्युत वितरण कंपनीतर्फे विद्युत जोडणी कशाच्या आधारे देण्यात आली? हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरीही या प्रकरणात पालिकेतील काही नगरसेवक व कर्मचाऱ्यांनी संगनमत करून पालिकेच्या मालमत्तेची ‘वाट’ लावली आहे. पालिका कर्मचाऱ्यांतर्फे पालिकेच्या कोट्यवधी रूपयांच्या मालमत्तेची परस्पर विल्हेवाट लावणे सुरू आहे. या गैरप्रकाराला आळा घालणे आता काळाची गरज झाली आहे. या जागेवरील अतिक्रमण न काढल्यास नगरपालिकेची आणखी एक मालमत्ता अतिक्रमण करणाऱ्यांच्या घशात जाणार, हे निश्चित आहे. याकडे पालिकेने लक्ष वेधणे गरजेचे झाले आहे.
कर्मचाऱ्यांनी लावली मालमत्तेची वाट
By admin | Updated: December 15, 2015 00:22 IST