गावोगावी आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर, बच्चू कडू यांचे निर्देश
परतवाडा : अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यांत दिवसेंदिवस पशुधन व वाहन चोरींच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्याचा फटका शेतकरी व ग्रामीण जनतेला बसत आहे. याशिवाय दोन्ही शहरे व ग्रामीण भागात अवैध दारू, गुटखा विक्रीला उधाण आले आहे. त्याची गांभीर्याने दखल घेऊन अटकाव करण्याचे आदेश अचलपूर मतदारसंघाचे आमदार तथा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले.
बुधवारी परतवाडा येथील शासकीय विश्राम भवनात उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यांतील ठाणेदारांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर घटनांना अटकाव घालण्याकरिता विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. त्या अनुषंगाने आता प्रत्येक लहान व मोठ्या गावांत मुख्य व वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे तथा नाईट व्हिजन कॅमेरे बसविण्यात येणार आहेत, ज्यामुळे पशुधन व वाहनचोर यांच्यावर प्रशासनाची २४ तास कडक नजर राहील. त्यातूनच इतर घटनांना अटकाव होईल, असे बैठकीत मांडण्यात आले. बैठकीला अचलपूरचे एसडीपीओ पोपटराव अब्दागीरे, परतवाड्याचे ठाणेदार सदानंद मानकर, सरमसपुराचे ठाणेदार जमील शेख. आसेगाव पूर्णाचे ठाणेदार किशोर तावडे, पथ्रोटचे ठाणेदार जाधव, शिरजगावचे ठाणेदार पंकज दाभाडे, चांदूर बाजारचे सुनील किनगे, ब्राह्मणवाडा थडीचे ठाणेदार दीपक वळवी, अचलपूर प्रभारी ठाणेदार सुरेंद्र बेलखेडे उपस्थित होते.
बॉक्स
दारूमुळे उद्ध्वस्त कुटुंबाचे पुनर्वसन
तालुक्यात सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीतली व्यसनाधीन कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. व्यसनमुक्तीसाठी मुक्तांगण (पुणे) व ना. बच्चू कडू यांच्या संयुक्त विद्यमाने कुरळ पूर्णा येथे दोन महिन्यांचे विशेष व्यसन मुक्ती शिबिर होईल. कुटुंबातील होतकरू स्त्रिया व महत्त्वाकांक्षी मुलांकरिता व्यवसाय तथा शिक्षणाकरिता विविध पूरक योजना पोलीस व राज्यमंत्र्यांच्या विद्यमाने उपलब्ध केल्या जातील.
बॉक्स
राज्यमंत्र्यांच्या कार्यालयात कळवावी चोरांची नावे
पोलीस पाटील व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी गावातील चोर, अवैध दारू विक्रेते व त्यांना मदत करणाऱ्यांची नावे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कार्यालयात व स्थानिक पोलीस ठाण्यात कळवावी. त्यांची माहिती गोपनीय ठेवली जाणार आहे.