अमरावती : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांत बुधवारी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत आठ मतदारसंघ मिळून असलेल्या एकूण २२ लाख २१ हजार ६२३ मतदारांपैकी १४ लाख २२ हजार ८५७ मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला आहे. तर ७ लाख ९८ हजार ७६६ मतदारांनी मतदानाला खो दिला असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते.जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार बुधवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळदरम्यान मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत आठही विधानसभा मतदारसंघात १२५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या उमेदवारांच्या भाग्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. त्यामुळे या उमेदवारांच्या भाग्याचा अंतिम निर्णय रविवार मतमोजणीतून दिसून येणार आहे.जिल्ह्यात आठही मतदान संघांकरिता बुधवारी (१५ आॅक्टोबर) मतदान पार पडले. ७ लाख ७८ हजार २६१ पुरुष व ६लाख ४४ हजार ५९२ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मागील निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत दोनने वाढ झाली. बुधवारी जिल्ह्यातील आठही मतदारसंघात सकाळी ७ वाजतापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. सायंकाळी ६ वाजताची वेळ असताना मेळघाट मतदारसंघातील चार केंद्रांवर रात्री ८ वाजेपर्यंत मतदान सुरू होते. यावर्षी मतदारसंघामध्ये मतदाना संदर्भात उत्सुकता दिसून आली. मागील वर्षीच्या तुलनेत या निवडणुकीत मतदान २ टक्क्यांनी वाढले असले तरी प्रमुख पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढल्यामुळे कोण आघाडीवर राहील हे संभ्रम निकालानंतरच दूर होईल. सर्वाधिक मतदान यावेळी अचलपूर मतदार संघात आहे. येथे ७०.३७ टक्के मतदान झाले आहेत. यावेळी जिल्ह्यात २२ लाख २१ हजार ६२३ मतदार असताना १४ लाख २२ हजार ७५७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानामध्ये ६७ टक्के पुरुषांनी तर ६० टक्के महिलांनी मतदान केल्याची नोंद आहे. यामध्ये चार तृतीपंथीचादेखील समावेश आहे. मतदानाच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी ६४.११ इतकी आहे. यामध्ये सर्वात कमी मतदान हे अमरावती मतदारसंघात झाले आहे. येथे ५५.७४ टक्के मतदानाची नोंद असून त्या पाठोपाठ बडनेरा मतदारसंघात ५६.०८ टक्के मतदान झाले आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच मेळघाट मतदानात दुसऱ्या क्रमांकावर राहिले. यावेळी अचलपूर मतदारसंघात व्हीव्हीपॅटचा प्रयोग पहिल्यांदाच झाल्याने येथे मतदानाची टक्केवारी वाढल्याची चर्चा आहे.
आठ लाख मतदारांनी मतदानाकडे फिरविली पाठ
By admin | Updated: October 18, 2014 22:57 IST