कपिल पाटील : मृत शिक्षक नकाशेंच्या पत्नीची सांत्वनाअमरावती : शासनाकडून सातत्याने शिक्षकांना अपमानास्पद वागणूक मिळत आहे. शिक्षकांना बदनाम केले जात आहे. गुन्हेगारांसोबत त्यांना चोर ठरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिक्षकांची चहुबाजूंनी कोंडी करण्यात आली आहे. त्या कोंडीचा दाहक परिणाम म्हणून विजय नकाशे यांच्या आत्महत्येकडे पाहावे लागेल, अशी प्रतिक्रिया शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी दिली. सेमाडोह येथील प्रभारी मुख्याध्यापक विजय नकाशे यांच्या आत्महत्येनंतर आज शुक्रवारी आ. कपिल पाटील यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वना केली. अर्जुननगर परिसरातील निवासस्थानी भेट देऊन नीता नकाशे यांच्याशी चर्चा केल्यानंतर कपिल पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. विजय नकाशे हे अतिशय संवेदनशील आणि प्रामाणिक शिक्षक असल्याने त्यांना ही कोंडी सहन झाली नाही. समाजाच्या वाढलेल्या अपेक्षा, कामाचा वाढता व्याप आणि गुन्हेगार ठरविण्याची भीती या कोंडीत सामान्य शिक्षक सापडला आहे. सरकारने आता तरी शिक्षक आणि शिक्षणाकडे पाहुण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, अन्यथा राज्यातील शिक्षण व्यवस्था कोलमडायला वेळ लागणार नाही, अशी भीती आ. पाटील यांनी व्यक्त केली. राज्यातील सर्व शिक्षक बांधव आपल्या पाठीशी आहेत, अशी ग्वाही आ. पाटील यांनी विजय नकाशे यांच्या पत्नी नीता नकाशे यांना दिली. यावेळी त्यांनी नकाशे कुटुंबियांशी संवाद साधला. शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, नवनाथ गेंड, राजेंद्र झाडे, संदीप तडस, मंगेश खेरडे, कुमार बोबडे आदींची यावेळी उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
हा शैक्षणिक कोंडीचा परिणाम!
By admin | Updated: November 14, 2015 00:18 IST