अमरावती : जिल्हा परिषदेच्या शिक्षण व बांधकाम समिती सभापतींच्या निधनामुळे १८ जानेवारीपासून रिक्त असलेल्या सभापतिपदाची निवडणूक २० मार्च रोजी पार पडेल. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ८ मार्च रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण व बांधकाम समिती सभापती प्रियंका दगडकर यांचे जानेवारी महिन्यात निधन झाले. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. त्यामुळे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ चे कलम ९० नुसार विषय समिती सभापतींच्या अधिकारपद नैमित्तिकरीत्या रिकामे झाल्याने विषय सभापती क्रमांक ३ हे पद कलम ८३ (१-अ) मधील तरतुदीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या विशेष सभा बोलवून भरले जाणार आहे. त्यानुसार जिल्हाधिऱ्यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अमरावतीचे उपविभागीय अधिकारी उदय राजपूत यांनी नियुक्ती केली आहे. यासोबत सहायक अधिकारी म्हणून तहसीलदार संतोष काकडे यांचीही निवड केली आहे. त्यानुसार येत्या २० मार्च राेजी वरील विषय समिती सभापतिपदासाठी निवडणूक होणार आहे. परिणामी राजकीय घडामोडींनाही वेग येणार आहे.
बॉक्स
असा आहे निवडणूक कार्यक्रम
सभापतिपदासाठी नामनिर्देशनपत्रे २० मार्च सकाळी ११ ते दूपारी १ या वेळेत स्वीकारली जातील. दुपारी ३ वाजता सभेचे कामकाज सुरू होईल. उमेदवारांची नावे वाचून दाखविणे व नामनिर्देशपत्रांच्या छाननीनंतर नावे मागे घेण्यासाठी १५ मिनिटे वेळ देण्यात येईल. माघार घेणाऱ्या व रिंगणात असलेल्या उमेदवारांची नावे वाचून दाखविल्यानंतर आवश्यकता भासल्यास निवडणूक व त्यानंतर लगेच मतमोजणी होईल.