सर्वसामान्य हैराण, तेलबियांच्या किमती वाढल्याने वधारले दर
अमरावती : पामतेलाची आयात कमी आणि तेलबियांचे भाव गगनाला भिडल्याने खाद्यतेल महागले आहे. यामुळे सर्वसामान्यांना आता विनाफोडणीची भाजी खावी लागणार आहे. खाद्यतेल प्रतिकिलो जवळपास ४० ते ६० रुपये महागले असून, सर्वसामान्य कुटुंबांमध्ये सर्वाधिक सोयाबीनचा वापर होतो. या तेलात ४५ रुपयांची वाढ आहे, तर सूर्यफूल तेलात २० रुपयांची दरवाढ नोंदविली गेली आहे.
गतवर्षी सोयाबीनचा भाव ३२०० रुपये प्रतिक्विंटल होता. यंदा त्यात चांगली वाढ झाली असून, ५८०० रुपये क्विंटलचा दर आहे. भुईमूग ५८०० ते ६१०० रुपये क्विंटलवर गेले आहे. या तेलबिया महागल्यामुळे खाद्यतेलाचे भाव वधारले आहेत, शिवाय पामतेलाची आयातही शासनाने कमी केली आहे. त्यामुळे स्थानिक तेलामध्ये वाढ होऊन दरही वाढले आहेत. सोयाबीनचे तेल ९० रुपये प्रतिलिटर होते. ते आता १४५ वर पोहोचले आहेत. सूर्यफूल १७० वरून १९० रुपयांवर गेले आहेत. शेंगदाणा तेल १४० वरून २०० रुपयांवर गेले. सोयाबीन ९० रुपयांवरून १४५, तर सरकी तेल १०० रुपयांवर १३५ रुपयांवर पोहोचले आहे. किरकोळ किराणा दुकानात सोयाफीट, हेल्थफीटचा एक किलोचा पुडा आता १४० ते १५० रुपयांपर्यंत आहे. या महागाईमुळे सर्वसामान्यांना आता फोडणीची भाजी खाणे सोडून द्यावे लागणार आहे.
कोट
गृहिणींच्या प्रतिक्रिया
गॅसचा दर वाढला आहे. किराणाचेही भाव वधारले आहेत. आता तेल महाग झाले आहे. त्यामुळे भाजीला फोडणी द्यावी की नाही, असा आमच्यासमोर प्रश्न आहे. भाज्याही महागल्या आहेत. दरवाढीमुळे आता गरिबांना पोटभर खाणे परवडणारे नाही. शासनाने दर कमी करण्याची गरज आहे.
- भारती देशमुख, गृहिणी
कोट
डाळी महागल्या. त्यानंगर गॅस महागला. आता गोडे तेल महागले आहे. ९० रुपयांचे एक लिटरचे पॅकेट आता १४५ रुपये झाले आहे. काही दुकानदार तर १५० रुपये घेत आहे. नफ्याची सीमाच राहिलेली नाही. यामुळे गरिबाने खावे की नाही अशी परिस्थिती आहे. शासनाने थोडा विचार करावा.
- नंदा पोकळे, गृहिणी
कोट
सूर्यफूल, शेंगदाणा, सरकी आणि सोयाबीन या सर्वच तेलाचे दर वाढले आहे. करडईचा दर थोडा कमी आहे. परंतु, अन्य तेलाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या महागाईमुळे ओढाताण होत आहे. भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. त्यात तेलाच्या दरामुळे किचनचे बटेज कोलमडले आहे.
- राजकन्या मराठे,गृहिणी
कोट
गोडे तेलाचे भाव वाढल्याने आर्थिक बजेट कोलमडले आहे. भाववाढ झाल्याने काटकसरीने तेलाचा वापर सुरू आहे. महिनाभराचे रेशन भरताना तेलामुळे भार सहन करावा लागतो.
- नंदा रामटेके, गृहिणी
कोट
तेलबिया महागल्यामुळे तेलाच्या दरात वाढ झालेली आहे, शिवाय पामतेलाची आयात शासनाने कमी केली. करडई वगळता सर्वच तेलाचे भाव ४० ते ५० रुपयांनी वाढले आहेत. जिथे ९० रुपये भाव होता, ते तेल १४५ वर पोहचले आहे. शेतकऱ्यांना तेलबियासाठी चांगला भाव मिळत आहे, ही बाब समाधानकारक आहे.
- शरदचंद्र सरवय्या, व्यापारी
बॉक्स
खाद्यतेलाचे दर प्रति किलो
मार्च २०२० मार्च २०२१
तीळ १७० - २००
सूर्यफूल १७०- १९०
शेंगदाणा १४०- १७०
सोयाबीन ९०- १४५
सरकी तेल १००- १३५
----------------------
बॉक्स
मार्चमध्ये उच्चांकी वाढ....
मार्चमध्ये तेलाचे भाव वधारले आहेत.
शेंगदाणा : १७०
सोयाबीन: १४५
------------------
बॉक्स
तेलबिया महागल्याने भाववाढ
तेलबिया महागल्यामुळे तेलाचे दर वाढले आहेत. पामतेलाची आयातही कमी आहे
ReplyForward