आयुक्तांचा निर्णय : अतिक्रमित बांधकामाचीही चर्चा अमरावती : स्थानिक कॅम्प परिसरातील ‘महेफिल’ हॉटेलच्या संचालकांनी विना परवानगीे बांधकाम केल्याप्रकरणी दुप्पट दंड वसुलीचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. मुंबईला जाण्यापूर्वी आयुक्तांनी बुधवारी या फाईलवर स्वाक्षरी करुन एडीटीपी विभागाला कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता तिजोरीत किती रक्कम जमा होते?, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ‘हॉटेल महेफिल ईन’ आणि ‘ग्रँड महेफिल’ या दोन्ही प्रतिष्ठानांचे काही बांधकाम विनापरवानगी करण्यात आल्याची तक्रार महापालिकेला प्राप्त झाली होती. परंतु ‘महेफिल’विरुद्ध कारवाई करण्यास यापूर्वीचे कोणतेही आयुक्त धजावत नव्हते. मात्र, आयुक्त गुडेवार यांनी शहराला नियमांची अंमलबजावणी, शिस्त लावण्याचा ध्यास घेतल्याने अतिक्रमण, विनापरवानगी बांधकामांची शोधमोहीम हाती घेतली आहे. या अनुषंगाने शहरात उभारणत आलेल्या प्रशस्त अशा ‘महेफिल’ च्या बांधकामाची तपासणी त्यांनी एडीटीपीकडून करुन घेतली. आता महेफिलकडून दुप्पट दंड वसुलीचे आदेश आयुक्तांनी दिल्याने या प्रतिष्ठानाकडून महापालिकेच्या तिजोरीत किती रक्कम येते, याबाबत उत्सुकता आहे. महेफिल हॉटेलचे विनापरवानगीने बांधकाम असल्याप्रकरणी एडीटीपीला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मोठी रक्कम तिजोरीत जमा होईल. ही कारवाई शहराला नवे वळण लावणार, हे निश्चित.- चंद्रकांत गुडेवारआयुक्त, महापालिका
‘हॉटेल महेफिल’ला दुप्पट दंड
By admin | Updated: July 9, 2015 00:13 IST