धामणगाव काटपूर : शेतकऱ्यांचे पांढरे सोने असलेले कपशीचे पीक शेतकऱ्यांच्या हातून निसटल्याने आता शेतकऱ्यांची पूर्ण भिस्त तुरीच्या पिकावर होती. परंतु आता या पिकावर दवसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे हे पीक पिवळे पडून वाळण्याच्या मार्गावर आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामातील पिके शेतकऱ्यांच्या हाती येऊ शकली नाही. कपाशीवर बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे अनेक शेतकऱ्यांनी उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरविला. त्यामुळे नगदी पीक असलेले पांढरे सोनेही शेतकऱ्यांच्या हातून गेले. या पिकावर लावलेला उत्पादन खर्चदेखील पदरात पडला नाही. त्यातच उरली सुरली आशा आता तूर पिकावर होती. परंतु निसर्गाच्या दृष्टचक्रामुळे हे पीकसुद्धा हाती येईल की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दवसदृश परिस्थितीमुळे धामणगाव, काटपूर, पोरगव्हाण, तळेगाव, परिसरातील तुरीचे पीक पिवळे पडत आहे. त्यातच या भागात रोहींचे कळप रात्रीच्या वेळी येऊन पिकात शिरत असल्यामुळे मोठी हानी होत आहे. आधीच निसर्गाच्या लहरीपुरामुळे मेटाकुटीस आलेला शेतकरी वन्यप्राण्यांपासून रक्षण करण्यास असमर्थ ठरला आहे. वनविभागाने याकडे लक्ष देऊन वन्यप्राण्यांचा बंदोबस्त कराव, अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहे.