अमरावती : गरज असलेल्या रुग्णावरच 'रेमडिसिविर'चा वापर व्हावा. त्याच्या वापराबाबत अचूक नोंदी ठेवा. उपलब्ध इंजेक्शन येथील गरजू रुग्णांसाठीच वापरले जावे. इतर जिल्ह्यात जाऊ नये, कुठेही 'ब्लॅक मार्केट'ला थारा मिळता कामा नये. असे स्पष्ट निर्देश केंद्रीय आरोग्य पथकाने रविवारी कोविड रुग्णालयांना दिले.
ऑक्सिजनचाही गैरवापर होऊ नये. गरजूंना ते वेळीच उपलब्ध व्हावे. ऑक्सिजनचा वापर केव्हा करावा, याबाबत कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घ्यावे. इंजेक्शन, इतर सेवा व औषधांचा दरफलक रुग्णालयात ठळकपणे लावावा. शासनाच्या मार्गदर्शक सूचना पाळा, कोरोना बाधितांवरील उपचारांत 'रेमडिसिविर'चा वापर आवश्यक तिथेच व्हावा. याबाबत शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसारच कोविड रुग्णालयांनी कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय आरोग्य पथकाने रविवारी येथे दिले.
केंद्रीय आरोग्य पथकाकडून गत तीन दिवसांपासून जिल्ह्यातील विविध कोविड रुग्णालयांची तपासणी करण्यात येत आहे. चांदूर बाजार येथील आरोग्यम् रुग्णालयात विलगीकरण व इतर व्यवस्था अपुरी जाणवत असल्याने तिथे अशी व्यवस्था होईपर्यंत तेथील सेवा स्थगित करण्यात आली आहे. पथकाच्या उपस्थितीत सर्व कोविड रुग्णालयांतील डॉक्टरांची बैठक रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. पथकाचे सदस्य डॉ. अमितेश गुप्ता व डॉ. संजय राय, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, डॉ. विशाल काळे, डॉ. सचिन सानप व विविध डॉक्टर यावेळी उपस्थित होते.
बॉक्स
जिल्ह्यातील रुग्णांसाठी खाटा आरक्षित
अमरावती जिल्ह्यातील रुग्णालयांत नागपूर, यवतमाळ, वाशिम, अकोला, छिंदवाडा आदी परिसरातील अनेक रुग्ण उपचार घेतात. या स्थितीत जिल्ह्यातील रुग्णांसाठी खाटा उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयांतील ४० टक्के खाटा व खासगी रुग्णालयांतील, २५ टक्के खाटा जिल्ह्यातील रुग्णांसाठी आरक्षित ठेवण्याचे निर्देश पथकाने दिले.
बॉक्स
अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित हवी
रुग्णालयांनी फायर ऑडिट करणे आवश्यक आहे आणि ते केल्यानंतरही अग्निशमन यंत्रणेची नियमित तपासणी, आवश्यक नूतनीकरण वेळीच होणे गरजेचे आहे, असेही पथकाने नमूद केले. जनआरोग्य योजनेचा अधिकाधिक रुग्णांना लाभ द्यावा. योजनेचा लाभ मिळू न शकलेल्या रुग्णांचे अहवाल मागवून घ्यावेत व कार्यवाही करावी, असे पथकाने सांगितले.
बॉक्स
'डिस्चार्ज'ची माहिती पालिकेला कळवा
रुग्णालयातून उपचारानंतर घरी परतणाऱ्या रुग्णांची माहिती महापालिकेला व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना वेळीच कळवावी जेणेकरून पालिकेला त्यांच्याशी समन्वय साधून आवश्यक संपर्क, समुपदेशन आदी कार्यवाही करता येईल, असेही निर्देश पथकाने दिले. आतापर्यंत मयत बाधितांच्या नोंदी व इतर बाबींचे यथायोग्य विश्लेषण होण्यासाठी १६ एप्रिलला बैठक घेण्याचा निर्णय यावेळी झाला.