अमरावती : उद्योगधंद्यांना चालना मिळावी व जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी संचारबंदीचा निर्णय घेतला आहे. मात्र, दैनंदिन व्यवहारात कोविड प्रतिबंधात्मक वर्तणूक पालनाची जबाबदारी आता आपणा सर्वांची आहे. त्यामुळे कोविड प्रतिबंधात्मक वर्तणुकी अंतर्गत मास्कचा वापर, सामाजिक अंतर, सॅनिटायझर, तपासणी व लसीकरण या पंचसूत्रीचे सर्वांनी पालन करण्याचे आवाहन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले आहे.
संचारबंदीत जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवांसह बहुतांश बिगर जीवनावश्यक सेवाही सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. जनजीवन पूर्वपदावर आणण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र, पुन्हा रुग्ण वाढू नयेत यासाठी कोविड प्रतिबंधात्मक वर्तणुकीचे पालन करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. कोरोनाच्या दोन लाटा आल्या. सुरक्षिततेसाठी दोन्हीवेळा संचारबंदी लागू करावी लागली. आता पुन्हा संचारबंदी लागण्याची वेळ येऊ नये. त्यासाठी सर्वांची कृतिशील साथ मिळणे आवश्यक असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
गत एका वर्षात स्वतंत्र कोविड रुग्णालये, तालुक्याच्या ठिकाणी कोविड केअर सेंटर, विद्यापीठ व पीडीएमसीमध्ये चाचणी सुविधा, विलगीकरण गृहे, निवारागृहे, ऑक्सिजन प्लान्ट अशा कितीतरी सुविधा उभारण्यात आल्या. लसीकरणाला वेग देतानाच संपर्क, समन्वय व आरोग्य शिक्षणासाठी चार सर्वेक्षण घेण्यात आले. आताही संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने ठिकठिकाणी ऑक्सिजन प्लान्टच्या निर्मितीसह स्वतंत्र रुग्णालये, लहान मुलांसाठी स्वतंत्र उपचार व्यवस्था आदी विविध आरोग्य सुविधा उभारण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे, सर्वेक्षण, संपर्क व समन्वयाची साखळी अखंडित राखण्याचे निर्देश दिले असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
बॉक्स
दंडात्मक कारवाईची वेळ येऊ नये
तिसऱ्या लाटेचा धोका रोखण्यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना उद्योग, व्यावसायिक व नागरिकांचीही साथ मिळाली पाहिजे. नियम न पाळणाऱ्या दुकानांवर दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, दंडात्मक कारवाईची वेळच येऊ नये. कोरोनापासून आपले व इतरांचे, तसेच सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.
बॉक्स
लसीकरणाला वेग द्यावा
लसीकरण कार्यक्रमाला वेग देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी आरोग्य प्रशासनाला दिले आहेत. लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचू न शकणाऱ्या व्यक्तींसाठी जिल्हा प्रशासनाकडून ‘व्हॅक्सिनेशन ऑन व्हील्स’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. अशा नवनव्या उपक्रमांची अंमलबजावणी करून लसीकरणाचा विस्तार करावा, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.