दर्यापूर : डेंग्यू आजाराचा फैलाव जिल्हाभर सुरु असतानाच दर्यापुरात गुरुवारी एका ११ वर्षीय बालकाचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाला. परंतु डेंग्यू आजाराने मृत्यू झाल्याची पुष्टी वैद्यकीय सुत्राकडून होऊ शकली नाही. स्थानिक चौसष्ट जीन प्लॉट येथील प्रज्ज्वल प्रशांत काजे (११), असे मृत बालकाचे नाव आहे. गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास अमरावतीच्या खासगी रुग्णालयात त्याची प्राणज्योत मालवली. तो येथील आदर्श हायस्कूलचा इयत्ता पाचवीचा विद्यार्थी होता. दोन दिवसांपूर्वी त्याला ताप आला. येथील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. परंतु प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्याला लगेच अमरावतीच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गुरुवारी सकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.पुसदा येथील बालकही डेंग्यू पॉझिटिव्हपुसदा येथील इंद्रजीत रघुनाथ कोकरे (९ वर्षे) या बालकाला डेंग्यूची लागण झाली असून तो अमरावतीच्या खासगी रूग्णालयात उपचार घेत आहे. त्याचे वडील रघुनाथ कोकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांच्या घराशेजारचा खताचा ढिगारा हटविण्याची मागणी केली आहे.स्वच्छतेचे आवाहननेरपिंगळाई गावात ठिकठिकाणी पसरलेली अस्वच्छता आजार फैलावण्यास कारणीभूत ठरत आहे. गावकऱ्यांनी स्वच्छता पाळावी व डासांचा प्रादुर्भाव रोखावा, असे आवाहन सरपंच संगीता पोटे यांनी केले. ग्रामपंचायतीने स्वच्छता मोहीम राबवून डेंग्यूच्या विळख्यातून बाहेर काढावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दर्यापुरात बालक डेंग्यूने दगावले?
By admin | Updated: November 13, 2014 22:54 IST