अमरावती : उन्हाळा लक्षात घेता जिल्ह्यात कुठेही पाणीटंचाई जाणवू नये, याची पुरेपूर दक्षता घ्यावी व आराखड्यातील प्रस्तावित कामांना वेग द्यावा. जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनांची कामे व प्रलंबित बाबी गतीने पूर्ण कराव्यात. कुठल्याही बाबतीत प्रशासकीय कुचराई खपवून घेणार नसल्याचा इशारा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सोमवारी आढावा बैठकीत दिला.
संभाव्य पाणीटंचाई निवारण उपाययोजना व विविध जलयोजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी आमदार बळवंत वानखडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, हरिभाऊ मोहोड, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे आदी उपस्थित होते. मागील पावसाळ्यात ९६ टक्के पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी उपलब्ध आहे. मात्र, आवश्यक तिथे टंचाई निवारणासाठी १५.२ कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला. त्यात आवश्यकता लक्षात घेऊन ९२२ पैकी ६३५ गावे समाविष्ट आहेत. उपविभागीय अधिकाऱ्यांकडून विहीर अधिग्रहण सुरू करण्यात येत आहे.
आराखड्यानुसार, ९२ विंधनविहिरी, २२१ नळयोजनांची विशेष दुरुस्ती, ५६ तात्पुरती नळयोजना, ३६ प्रगतीपथावरील योजना पूर्ण करणे, ४३ टँकर पाणीपुरवठा व ४७४ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली. आराखड्यातील प्रस्तावित कामे वेळेत पूर्ण व्हावीत. या कामांचा वेळोवेळी आढावा घ्यावा. कुठेही टंचाई उद्भवता कामा नये, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
बॉक्स
उदासीनता झटका,यंत्रणेला निर्देश
जलजीवन मिशनमध्ये अनेक कामे प्रलंबित आहेत. प्राधिकरणाने कामाने वेग द्यावा. कामात कुचराई खपवून घेणार नाही, असा इशारा पालकमंत्र्यांनी दिला. ज्या गावांचा पाणीपुरवठा योजनेत समावेश आहे, तिथे चार- सहा दिवसांआड पुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत प्रत्येक प्रकरणात स्वतंत्रपणे लक्ष देऊन पाणीपुरवठा सुरळीत करावा. आवश्यक तिथे पर्यायी व्यवस्था करण्याचे पालकमंत्र्यांनी दिले.
बॉक्स
जलजीवन मिशनमध्ये या गावांचा समावेश
जलजीवन मिशनमध्ये चांदूर बाजार तालुक्यातील १९ गावे, अचलपूरमधील २४ गावे, चांदूर बाजार-अमरावती-भातकुली-अचलपूर तालुक्यातील १०५ गावे, अमरावतीत नांदगावपेठ व ३३ गावे, अंजनगाव दर्यापूरमधील १४४ योजनांची दुरुस्ती, चिखलदरा तालुक्यातील गौरखेडा व ३५ गावे, शहापूर व तीन गावे व मोर्शीमधील ७० गावे योजनेचा समावेश आहे.