पुरस्कार वितरण तत्काळ करा : उत्कृष्ट अध्ययनासाठी मिळेना प्रेरणाअमरावती : चांगल्या शिक्षकांचे कौतुक करण्यासाठी दिले जाणारे जिल्हास्तरीय शिक्षण पुरस्कार जिल्ह्यात रखडलेले आहेत. पुरस्कार देण्यासाठी विलंब का केला जात आहे, याबद्दल गूढ निर्माण झाला आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांची संख्या अधिक आहे. मात्र यातूनच उत्कृष्ट व वेगळे काम करणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. मागील काही वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. याची चांगलीच चर्चा होते. तालुका ते राज्यस्तरावर अशा पुरस्काराचे वितरण करण्यात येते. राज्यस्तरावरील पुरस्काराचे १५ दिवसांपूर्वीच वितरण करण्यात आले आहे. काही तालुक्यांतही पुरस्कार वितरीत करण्यात आले आहेत. मात्र जिल्हास्तरीय पुरस्कारांना वितरण करण्यासाठी अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही. पुरस्कारातून प्रेरणा घेऊन अन्य शिक्षकांनीही उत्कृष्ट काम करण्यासाठी या उपक्रमाचे नियोजन करण्यात येते. मात्र जिल्हा परिषदेच्या अनियोजनबद्ध कारभारामुळे पुरस्कार रखडले आहेत. वास्तविक पहाता शिक्षक दिनाच्या दिवशी म्हणजे ५ सप्टेंबरला पुरस्कार वितरण होणे आवश्यक आहे. मात्र आता दीड महिना झाला तरी पुरस्कार वितरण झाले नाही. मागील तीन वर्षांचा कार्यकाळ पाहून पुरस्कार देण्यात येत असतो. यामध्ये गोपनीय अहवाल, शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी ठरलेले विद्यार्थी आदी निकष विचारात घेतले जातात. या बाबीची तयारी अगोदरच होऊ शकते, मग उशीर होत असल्याबाबत उलटसुलट चर्चा शिक्षण क्षेत्रात का सुरू आहेत, यावर खल होणेही गरजेचे आहे. त्यामुळे ही सर्व बाब लक्षात घेता आदर्श शिक्षक पुरस्कारांना जिल्हा परिषद प्रशासन केव्हा मुहूर्त काढते, यासकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)ग्रामीण भागात कार्यक्रमनगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू झाल्याने पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम टाळला जाण्याची शक्यता आहे. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार ग्रामीण भागात हा कार्यक्रम घेता येऊ शकतो.आमच्या सन्मानासाठी आम्हालाच आंदोलन करण्याची वेळ येणार आहे. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना भेटून लवकरच या कार्यक्रमाबाबत त्यांना अवगत करू.- किरण पाटील, राज्य उपाध्यक्ष, अखिल महाराष्ट्र शिक्षक संघ
जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्काराला मुहूर्त मिळेना
By admin | Updated: October 25, 2016 00:18 IST