७ ला धडक : जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांची माहिती अमरावती : केंद्र व राज्यातील भाजप सरकारने ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजुरांची फसवणूक केली आहे. त्यामुळे जनहितविरोधी शासनाविरोधात शनिवार ७ जानेवारी रोजी काँग्रेस पक्षाच्यावतीने जिल्हाकचेरीवर जनाक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी गुरूवारी पत्रपरिषदेत दिली. भाजप शासनाच्या जनहितविरोधी धोरणामुळे राज्यात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तरीही या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. विजय माल्या सारख्या उद्योगपतींचे हजारो कोटींचे कर्ज सरकारने माफ केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. अशातच आता नोटाबंदीचा निर्णय घेऊन शेतकरी, सर्वसामान्यांचा अक्षरश: छळ चालविला आहे. नोटाबंदीचा निर्णय काळयापैशाच्या विरोधातील लढाई असल्याचा गाजावाजा करीत जनतेच्या डोळ्यांत धूळफेक केली जात आहे. भाजपचे खरे रूप जनतेसमोर आणण्याकरिता व शासनाचा निषेध करण्याकरिता काँग्रेस पक्षाच्यावतीने हा जनाक्रोश मोर्चा इर्विन चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येईल. पत्रपरिषदेला आ.वीरेंद्र जगताप, जिल्हा प्रभारी शेखर शेंडे, संजय खोडके, माजी आमदार केवलराम काळे, संजय अकर्ते, यशवंत शेरेकर, विलास इंगोले, बबलू शेखावत, किशोर बोरकर, सतीश उईके, प्रकाश काळबांडे, संजय मापले, संजय वानखडे, अभिजित देवके, मोहन सिंघवी, प्रल्हाद ठाकरे, विद्या देडू, छाया दंडाळे, अर्चना सवाई, उषा उताणे, विद्या देडू, बच्चू बोबडे, बबलू बोबडे, अनिल बोके, हसिना शहा, सिद्धार्थ वानखडे, गणेश आरेकर, मोहन पाटील, भागवत खांडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
भाजप शासनाविरोधात जिल्हा काँग्रेसचा जनाक्रोश मोर्चा
By admin | Updated: January 6, 2017 00:30 IST