करजगाव : चांदूरबाजार तालुक्यातील करजगाव येथील रास्त भाव दुकानात धान्य वितरणात घोळ झाल्याचा ठपका चौकशीअंती ठेवला आहे. त्याबाबतचा अहवाल तहसीलदारांकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
तालुका पुरवठा निरीक्षक शैलेश देशमुख हे धान्य वितरण करतेवेळी दाखल झाले होते. त्यांनी ५८ ग्राहकांच्या तक्रारी वजा बयान घेतले व धान्य साठ्याची पाहणी केली. हे दुकान महिन्याच्या १५ ते २० तारखेनंतर केवळ सकाळी ११ पर्यंत उघडे राहते. शिधापत्रिका धारकांना त्यांच्या हक्काची पावती मिळत नाही.याबाबत तहसीलमधून रोल मिळत नसल्याचे सांगण्यात येते. निर्धारित शासकीय दरापेक्षा जादा रक्कम घेऊन ग्राहकांची लूट केली जाते. धान्य कमी दिले जाते. मेमध्ये अंत्योदय व प्राधान्य गटाला विनामूल्य वितरणाच्या धान्याचे पैसे घेण्यात आले. एप्रिल महिन्यात शेतकरी योजनेत आदेश नसतानाही मका वितरित करण्यात आला. एप्रिल ते मे महिन्याच्या साठ्यात गहू १५ किलो, तांदूळ ९.४८ किलो, चणाडाळ ८.८६ किलो, मका ३.३५ किलो व साखर पाच किलो जास्त आढळून आली. एकूण तपासणीत गहू २०.०४ क्विंटल, तांदूळ १३.८९ क्विंटल, साखर १७ किलो, चणाडाळ ८.८६ क्विंटल व मका ५.०४ क्विंटल असा धान्यवाटपात अपहार केल्याचे पुरवठा निरीक्षक यांनी चौकशीत नमूद केले. स्वस्त धान्य दुकानाच्या संचालक सुनंदा उमेश ठाकरे यांच्याकडून अपहरित धान्याची बाजारभावाने वसुली करण्यात यावे व ठाकरे यांचे प्राधिकार पत्र रद्द करण्यात यावे, असा अहवाल पुरवठा निरीक्षक शैलेश देशमुख यांनी तहसीलदार धीरज स्थूल यांना सोपविला. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी टाकसाळे यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता, प्रतिसाद मिळाला नाही.
डिसेंबर महिन्यात गोविंदपूर येथील रास्त भाव दुकानात अपहार आढळून आल्यानंतर पुरवठा निरीक्षक शैलेश देशमुख यांनी परवाना रद्द करण्याचा अहवाल दिला होता. परंतु, जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या फेरतपासणीत अनामत रक्कम एक हजार रुपये जप्त करण्यात आली. शिधापत्रिकाधारकांनी धान्य विकल्यास शिधापत्रिका रद्द करण्यात येणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली होती.परंतु, रास्त भाव दुकान दार यांनी धान्य विकल्यास किंवा अफरातफर केल्यास काय कारवाई केली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.
------------------
सदर रास्त भाव दुकानाची चौकशी केली. धान्यात अपरताफर आढळून आली आहे. अहवाल तहसीलदार धीरज स्थूल यांना सोपविण्यात आला. जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे प्रकरण पाठविण्यात आले आहे. फेरतपासणीपश्चात अंतिम निर्णय देण्यात येईल.
- शैलेश देशमुख, पुरवठा निरीक्षक, अचलपूर
===Photopath===
290621\img_20210629_115740.jpg
===Caption===
राशन दुकान