पान २ ची बॉटम
रस्त्यावर गर्दी : परिधान, किराणा, विविध साहित्यांची खरेदी
परतवाडा : होळी या सर्वात मोठ्या सणासाठी गावी परतू लागलेल्या आदिवासी बांधवांनी गुरुवारी शहरातून विविध साहित्य व कपड्यांची खरेदी केली. त्यामुळे कोरोना काळात अनेक दिवसानंतर रस्ते गर्दीने फुलून गेले होते.
आदिवासी बांधव दिवाळीपेक्षाही होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. वर्षभर अंगमेहनतीची कामे करीत अन्य शहरात रोजगारासाठी गेलेले आदिवासी आता गावी परतू लागले आहेत. केलेल्या कामाचे वेतन मिळाल्याने घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी परतवाडा या मोठ्या बाजारपेठेतून चीजवस्तू खरेदी करण्यात आल्या. किराणा व इतर साहित्याचीसुद्धा खरेदी करण्यात आली. त्यामुळे चिखलदरा स्टॉप, गुजरी बाजार, रेस्ट हाऊस चौक, दुराणी चौक व आठवडी बाजारपर्यंत आदिवासींचे जत्थे खरेदी करताना दिसून आले.
बॉक्स
होळीनंतर १५ दिवस सुटी
आदिवासीं लहान आणि मोठी अशा दोन होळींचे दहन करतात. पाच दिवसांत त्यांचा रंगपंचमीचा फगवा चालतो. परंतु, यंदा कोरोनामुळे सर्वत्र संचारबंदी असल्याने पहिल्यांदा त्यांच्या या सर्वात मोठ्या होळी सणावर संक्रांत येणार आहे. मात्र, धूलिवंदन दरम्यान आदिवासी किमान १५ दिवस कुठल्याच कामावर न जाता गावातच राहून मौजमजा करतात. आदिवासी पाड्यांमध्ये होळी सणाची चाहूल सुरू झाली आहे.