तिवसा : राज्यात भाजपविरोधात तयार झालेली महाविकास आघाडी तिवसा तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पॅनेलआडून तयार झाली आहे. तिवसा मतदारसंघाच्या आमदार व अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा हा मतदारसंघ असल्याने काँग्रेस पक्ष गटबाजी विसरून जोमाने एकत्र आला आहे.
तिवसा तालुक्यात २९ ग्रामपंचायतींसाठी सोमवारपर्यंत १९१ उमेदवारी अर्ज दाखल झाले. ३० डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख असून, १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. ही निवडणूक जुलै महिन्यात होणार होती. मात्र, कोरोनामुळे ती लांबणीवर पडली. दरम्यान, उमेदवारांना कोरोना चाचणी अनिवार्य आहे. निगेटिव्ह रिपोर्ट असलेल्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरता येणार आहे, तर तिवसा तालुक्यातील आठ उमेदवारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती तहसील प्रशासनाकडून मिळाली. त्यामुळे तहसील कार्यालयात होत असलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे झाले आहे.