मोहन राऊत
धामणगाव रेल्वे : कूलरमधील पाणी संपताच बटन बंद न करता पाणी टाकणे, सुरू असलेल्या कुलरमध्ये पाणी भरणे, कूलरची बटन सुरू- बंद करणे यात तालुक्यातील आठ जणांचा बळी गेला. सात वर्षांमधील ही आकडेवारी आहे.
वाढते तापमान, त्यात थंडावाचा आश्रय घेण्यासाठी प्रत्येक जण पुढे येतात. मात्र, कूलरचा वापर कसा करावा, याची काळजी घेतली जात नाहीत. धामणगाव तालुक्यात गव्हा फरकाडे, जुना धामणगाव, दत्तापूर येथील कूलरच्या चुकीच्या वापरामुळे आतापर्यंत सात जणांचा बळी गेला. कूलरमधील पाणी खाली जमिनीवर सांडणार नाही, याची काळजी घेतली जात नाही. ओल्या हाताने कूलरला स्पर्श करण्यात येतो. कूलरची वायर तपासली जात नाही. फायबर बाह्यभाग असलेल्या व चांगल्या प्रतीच्या कूलरचा वापर करण्यात येत नाही. घरातील मुले वा इतर सदस्य कूलरच्या सान्निध्यात येणार नाही, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. ओल्या हाताने किंवा ओल्या जमिनीवर उभे राहून पंप सुरू करण्यात येते. पंपातून पाणी येत नसेल, तर पंपाचा वीजपुरवठा बंद न करता किंवा त्याचा प्लग काढण्यापेक्षा पंपाला हात लावला जातोय, ही काळजी घेतली जात नाही.
अशी घ्या काळजी
कूलरचा वापर थ्री पीन प्लगवरच करावा. घरात अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर्स बसवून घ्यावेत. अर्थिंग योग्य असल्याची तपासणी सातत्याने करावी. कूलरमध्ये पाणी भरताना आधी कूलरचा वीजप्रवाह बंद करून प्लग काढावा. मगच त्यात पाणी भरावे. कूलर लाकडी स्टॅण्डवर ठेवावा. कूलरच्या आतील वीज तार पाण्यात बुडाली नसल्याची खात्री करून घ्यावी. कूलरमधील पाणी खाली जमिनीवर सांडणार नाही, याची काळजी घ्या. ओल्या हाताने कूलरला स्पर्श करणे टाळा. वायर सदैव तपासून घेणे गरजेचे आहे.
कोट १
फायबर बाह्यभाग असलेल्या व चांगल्या प्रतीच्या कूलरचा वापर प्राधान्याने करणे महत्त्वाचे आहे. घरातील मुले व इतर सदस्य कूलरच्या सानिध्यात येणार नाही, याची खबरदारी घेऊनच कुलर ठेवावा. ओल्या हाताने किंवा ओल्या जमिनीवर उभे राहून टिल्लू पंप सुरू करू नये.
- राजेश चौबे, धामणगाव रेल्वे