भातकुली : प्रादेशिक पर्यटन योजनेत सांसद आदर्श ग्राम धामोरी येथील नियोजित कामांसाठी गत आठवड्यात ३० लाखांचा निधी वितरित झाला. त्यापुढील निधीही तात्काळ मिळून विकासकामे लवकर पूर्ण होण्यासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यामुळे पुढील टप्प्यांतील ८५ लाख रुपयेही शासनाकडून वितरित करण्यात आले आहेत. त्यामुळे तेथील रखडलेल्या विकासकामांना गती मिळणार आहे.
प्रादेशिक पर्यटन योजनेत भातकुली तालुक्यातील सांसद आदर्श ग्राम धामोरी येथील विकासकामांसाठी २ कोटी ५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर आहे. त्यापैकी प्रत्येकी ३० लक्ष रुपये निधी दोन टप्प्यांत प्राप्त झाला. नियोजित कामांसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने कामात अडथळे आले. हे लक्षात घेऊन पालकमंत्री ठाकूर यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन पाठवून याबाबत प्रत्येक टप्प्यावर पाठपुरावा केला. त्यानुसार पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आता पुढील टप्प्यातील ८५ लाख रुपयेही वितरित करण्यात आले आहेत.
आदर्श ग्राममध्ये पायाभूत सुविधा, सौंदर्यीकरणही
पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक विकास पर्यटन योजना राबवली जाते. आदर्श ग्राम धामोरी येथे पायाभूत सुविधांसह सौंदर्यीकरणाची अनेक कामे २ कोटी ५ लक्ष रुपये निधीतून केली जाणार आहेत. धामोरी येथे मुख्य रस्त्यापासून तलावापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण व पेव्हरने सुधारणा करण्यासाठी ४३ लक्ष ३० हजार, स्वच्छतागृहाच्या बांधकामासाठी ११ लक्ष ७० हजार, धामोरी येथील तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी २५ लक्ष, तलावाच्या आऊटलेटवर लहान पुलाचे बांधकाम करण्यासाठी २२ लक्ष निधी मंजूर आहे. पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने व बाळगोपाळांसाठी खेळण्यासाठी ४० लक्ष रुपये निधीतून खेळणीही बसविण्यात येणार आहेत.